
सोलापूर (Solapur) : जुना पूनानाका ते सीएनएस हॉस्पिटल या मार्गाला जोडणारा ॲप्रोच रस्त्याच्या कामासाठी तीन कोटी रुपयांचे टेंडर काढण्यात येणार आहे. भैय्या चौकातील रेल्वेपूलाच्या बांधकामासाठी महिन्याभरात हा मार्ग सर्वच वाहतूकदारांसाठी बंद होणार आहे. आठ वर्षांपासून प्रलंबित रस्ता मार्गी लागणार आहे.
रेल्वे स्थानकाच्या पश्चिम बाजूला एक लाख नागरिकांची लोकवस्ती आहे. या परिसरातील नागरिकांना भैय्या चौकातून शहरातील मुख्य बाजारपेठ, एस.टी. स्थानक, रेल्वेस्थानक, नामवंत महाविद्यालय, शाळा हे अगदी हाकेच्या अंतरावर आहे. या मार्गावरून विद्यार्थी, नोकरदार, शाळकरी विद्यार्थी यांच्यासह ग्रामीण भागातील शेतकरी आदींना वाहतुकीसाठी महत्त्वाचा चौक आहे. मात्र, भैय्या चौक ते मरिआई चौक दरम्यान असणारा रेल्वे पूल धोकादायक बनल्याने ते पाडण्यात येणार आहे.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून नव्याने पुलाची उभारणी होत आहे. त्यासाठी टेंडर काढण्यात आल्याने हा पूल महिन्याभरात कधीही पाडले जाणार आहे. या चौकातील वर्दळीला ५४ मीटर रस्ता हा एकमेव पर्यायी मार्ग असणार आहे. ही काळाची गरज ओळखून महापालिका प्रशासन ॲप्रोच रस्त्याच्या कामाची गती वाढवली आहे. जिल्हा नियोजन समितीअंतर्गत तीन कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते. दोन दिवसांमध्ये या कामाचे टेंडर निघणार आहे. त्यानंतर ॲप्रोच रस्त्याच्या कामाला गती येणार आहे. आठ वर्षांपासून रखडलेले प्रकल्प अखेर मार्गी लागणार आहेत.