
अहिल्यानगर (Ahilyanagar) : अरबी समुद्राकडे जाणारे पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली हाती घेतला आहे. हा प्रकल्प यशस्वी करून सुमारे ५२ टीएमसी पाणी उपलब्ध केले जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पाठबळ या प्रकल्पासाठी आहे. आगामी तीन ते चार वर्षांमध्ये हा प्रकल्प मार्गी लागेल, असा विश्वास जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrishna Vikhe) यांनी व्यक्त केला.
मंत्री विखे यांच्या अध्यक्षतेखाली कुकडी व घोड कालवा सल्लागार समितीची बैठक अहिल्यानगरमध्ये झाली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मंत्री विखे म्हणाले की, गोदावरी खोऱ्यातील समन्यायी पाणीवाटपासाठी जायकवाडी प्रकल्पात ६५ टक्के जलसाठ्याची अट मेंढेगिरी समितीने निश्चित केली होती. ती आता सात टक्क्यांनी कमी करून ५८ टक्क्यांवर केली आहे. मात्र, ही समिती मी जलसंपदा खात्याचा पदभार घेण्यापूर्वी कार्यरत आहे. याबाबत लवकरच बैठक घेणार असून, आढावा घेतला जाईल. मात्र, कोणत्याही परिस्थितीमध्ये मराठवाड्यावर अन्याय होणार नाही, अशी भूमिका घेतली जाईल. अरबी समुद्राकडे पश्चिम वाहिनी नद्याचे पाणी जाते. हे पाणी गोदावरी खोऱ्यात वळविल्यास ५२ टीएमसी पाणी उपलब्ध होणार आहे. त्यानंतर सर्व प्रश्नही मार्गी लागतील.
मुळा धरणातील गाळ काढून त्याची उंची वाढविण्यासंदर्भात स्वतंत्र प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना दिली आहे. राज्यातील धरणांमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. त्यामुळे धरणातील पाणी साठवण क्षमता कमी झाली आहे. गाळ काढण्यासंदर्भात याआधी काही निर्णय झाले आहे का? त्याची लवकरच माहिती घेऊ, असेही त्यांनी स्पष्ट केले. अद्यापही पालकमंत्री निश्चित झालेले नाहीत. याविषयी विचारले असता मंत्री विखे पाटील म्हणाले की, लवकरच पालकमंत्रिपदाबाबत निर्णय घेतला जाईल. शेवटी तीन पक्षाचे सरकार आहे. हे सर्वस्वी अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे. त्यामुळे सर्वांचा विचार घेऊनच पालकमंत्री पदाबाबत निर्णय घेतला जाईल.