
पंढरपूर (Pandharpur) : श्री विठ्ठल-रुक्मिणीचे भाविकांना सुलभ आणि जलद पदस्पर्श दर्शन घेता यावे, यासाठी उभारण्यात येणाऱ्या दर्शन मंडप आणि स्कायवॉकच्या कामासाठी काढण्यात आलेली सुमारे 129 कोटींची टेंडर प्रक्रिया रद्द करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. दर्शन मंडपाचे टेंडर रद्द झाल्याची माहिती मिळताच अनेक वारकऱ्यांनी सरकारच्या भूमिकेविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली.
श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांना तासन्तास दर्शन रांगेत ताटकळत उभा राहावे लागते. यावर कायमस्वरूपी उपाय म्हणून टोकन दर्शन सुविधा सुरू करण्याचा मंदिर समितीने निर्णय घेतला आहे. त्यासाठी स्वतंत्र दर्शन मंडप आणि स्कायवॉकची आवश्यकता आहे. आषाढी यात्रेदरम्यान तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक दिवस आधी येऊन आषाढी यात्रा पूर्व तयारीची पाहणी केली होती. त्यावेळी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दर्शन मंडप आणि स्कायवॉकची संकल्पना मांडली होती. त्यानंतर एकनाथ शिंदे यांना प्रजेंटेशनही देण्यात आले होते. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी या प्रस्तावित दर्शन मंडप आणि स्कायवॉकला परवानगी देत सुमारे 129 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. त्यानुसार तयार केलेल्या दर्शन मंडप आणि स्कायवॉकच्या आराखड्यास राज्य सरकारच्या उच्च अधिकार समितीसह शिखर समितीने मान्यता दिली होती. सरकार पातळीवरील मान्यतेचे सर्वसोपास्कार पूर्ण झाल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने या कामाची टेंडर प्रक्रिया सुरू केली होती. दरम्यान अचानक या कामाची टेंडर प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे. शासनाच्या या भूमिकेविषयी राज्यातील लाखो भाविकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
मुख्यमंत्र्यांच्या सप्तसूत्रीत समावेश, तरीही टेंडर रद्द
विशेष म्हणजे, दर्शन मंडप आणि स्कायवॉक हे काम १०० दिवसांच्या सप्तसूत्रीत घेऊन तत्काळ चालू करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हा प्रशासनाला आदेशही दिले होते. त्यानंतर सोलापुरातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता कार्यालयात २८ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता या निविदा उघडल्या जाणार होत्या. मात्र वरिष्ठ पातळीवरून ही निविदा रद्द का झाली? याचे ठोस कारण अद्याप समोर आले नाही. दरम्यान तांत्रिक कारणामुळे ही टेंडर प्रक्रिया थांबविण्यात आल्याची माहिती नाव न छापण्याचा अटीवर एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
शिंदे- फडणवीस यांच्यातील शीतयुद्धाचा फटका
राज्यात पुन्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात घेतलेल्या अनेक विकासकामांना व निर्णयांना कात्री लावल्याचे समोर आले आहे. अशातच आता एकनाथ शिंदे यांनी वारकऱ्यांसाठी घेतलेल्या दर्शन मंडप आणि स्कायवॉक कामाचे 129 कोटी रुपयांचे टेंडर रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रकारानंतर राज्यात शिंदे -फडणवीस यांच्यातील शीतयुद्ध पुन्हा एकदा समोर आले आहे. दरम्यान, या राजकीय साठमारीमध्ये लाखो भाविकांच्या सोयीसाठी उभारण्यात येणाऱ्या दर्शन मंडप आणि स्कायवॉक कामाला खो बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी वारकऱ्याच्या हिताचे अनेक चांगले निर्णय घेतले. दर्शन मंडप आणि स्कायवॉक हा त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. पंढरपूर हे देशातील सुंदर आणि चांगले तीर्थक्षेत्र व्हावे ही त्यांची भावना आहे. पंढरपूरच्या विकासासाठी त्यांनी मागेल तेवढा निधी दिली आहे. वारकऱ्यांच्या हिताच्या आड कोणी येणार असेल तर वारकरी म्हणून आम्ही ते सहन करणार नाही. केवळ
एकनाथ शिंदे यांनी हा निर्णय घेतला म्हणून जर रद्द करत असाल तर झारीतील शुक्राचार्य कोण? याचा शोध घ्यावा लागेल. शासनाने पुन्हा आठ दिवसामध्ये नव्याने टेंडर प्रक्रिया सुरू करावी अन्यथा सरकारच्या विरोधात तीव्र आंदोलन केले जाईल.
- अक्षय महाराज भोसले, प्रदेशाध्यक्ष, धर्मवीर आध्यात्मिक सेना