
महाबळेश्वर (Mahabaleshwar) : येथील नगरपालिकेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी योगेश पाटील यांच्या प्रयत्नातून ‘स्काय लिफ्टर’चा पालिकेच्या वाहनताफ्यात समावेश झाला आहे.
यामुळे महाबळेश्वर शहरातील वाहतुकीला व विद्युतरोषणाईला अडथळा निर्माण करणाऱ्या फांद्या अथवा विद्युत खांबावरील देखभाल, दुरुस्तीची कामे जलदगतीने होणार आहेत, तसेच कामगारांच्या सुरक्षिततेसह कामाला गती मिळणार आहे.
महाबळेश्वर शहराचा प्रशासकीय कारभार हाती घेतल्यापासून सर्वसामान्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी पाटील यांनी प्राधान्य दिले. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वापर करून कायमस्वरूपी तोडगा काढत कामांचा जलद निपटारा करण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत.
कल्पक व प्रशासकीय दूरदृष्टीने ३४ लाख रुपयांची स्वयंचलित स्काय लिफ्टर वाहनाची खरेदी नुकतीच करण्यात आली.
स्काय लिफ्टर वाहनांमुळे यांत्रिक पद्धतीने कर्मचाऱ्यांना पथदिवे देखभाल, दुरुस्ती आणि शहरातील झाडांच्या वाढलेल्या फांद्या काढण्याचे काम तिन्ही ऋतूंमध्ये सुरक्षितपणे करता येणार आहे, तसेच ४० फूट उंचीवर जाऊन एखादे अडचणीचे काम करणे देखील सोपे झाले आहे. त्यामुळे पालिकेचा अतिरिक्त मनुष्यबळाचा वापर कमी होणार असून, कामांचा निपटारा स्काय लिफ्टरमुळे जलदगतीने होणार आहे.