Ajit Pawar : पुढील 30 वर्षांचा विचार करून रस्त्यांची कामे दर्जेदार करा

‘कोरेगाव-फलटण’ रेडे घाट मार्गाची पाहणी करून आराखड्यासह अंदाजपत्रक तयार करावे
Ajit Pawar
Ajit PawarTendernama
Published on

मुंबई (Mumbai) : कोरेगाव शहरासह तालुक्यात सातत्याने होणारी वाहतूक कोंडी आणि संभाव्य रस्ते अपघात टाळण्यासाठी ल्हासुर्णे ते कुमठे बाह्यवळण रस्ता, तसेच ल्हासुर्णे-कुमठे-वडाचीवाडी बाह्यवळण रस्त्यांची कामे पुढील तीस वर्षांचा विचार करून दर्जेदार पद्धतीने करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिले. तसेच कोरेगाव ते फलटण अंतर कमी करणाऱ्या रेडे घाट मार्गाची तातडीने पाहणी करून आराखड्यासह खर्चाचे अंदाजपत्रक तयार करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

Ajit Pawar
सरकारचा मोठा निर्णय; अटल सेतूवर सवलतीच्या दराने आणखी वर्षभर टोल

कोरेगाव (जि. सातारा) तालुक्यातील रस्त्यांच्या कामांचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात उपमुख्यमंत्री कार्यालयातील समिती सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, सातारा जिल्ह्यातील कोरेगाव शहरासह तालुक्यातील वाहतूक कोंडी आणि संभाव्य अपघात टाळण्यासाठी ल्हासुर्णे ते कुमठे, ल्हासुर्णे-कुमठे-वडाचीवाडी बाह्यवळण रस्त्यांची कामे तातडीने हाती घेण्याची आवश्यकता आहे. मात्र ही कामे करताना पुढील तीस वर्षांच्या वाढणाऱ्या वाहतुकीचा विचार करण्यात यावा. हे रस्ते दर्जेदार व मजबूत करण्यावर भर द्यावा. त्याचबरोबर एकसळ ते कुमठे रस्त्याचे कामही मार्गी लावावे.

Ajit Pawar
Mumbai : 'मुंबई उपनगर' डीपीडीसीत 943 कोटींचा आराखडा मंजूर; झोपडपट्ट्यांमध्ये सुविधांसाठी 253 कोटींची वाढीव मागणी

कोरेगाव तालुक्यातील वाहतुकीचा ताण असलेला वर्धनगड घाट व त्रिपुटी येथील रस्त्याचे रुंदीकरण करून खिंड फोडण्यासाठी वनविभागाची परवानगी घेण्यासाठी महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाने तातडीने वनविभागाकडे प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. फलटण ते कोरेगाव प्रवासाचे अंतर कमी करणाऱ्या रेडे घाट मार्गाचे तातडीने पाहणी करून आवश्यक आराखडा व खर्चाचे अंदाजपत्रक तयार करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. यावेळी कोरेगाव तालुक्यातील चिमणगाव येथे जड वाहतुकीसाठी उड्डाणपूल बांधणे, कोरेगाव येथे उड्डाणपूल बांधणे, वडूथ व वाढे पूलाची पुनर्बांधणी करणे, माहुली (ता. सातारा) येथे नवीन पूल बांधणे, ल्हासुर्णे पुलाची उंची वाढविणे, तळगंगा नदीवर पूलाचे काम मार्गी लावणे, कोरेगाव शहराजवळील रेल्वे स्टेशनजवळील पूलाची उंची वाढविणे, कोरेगाव शहरात ड्रेनेजसह विटांच्या चेंबरचे काँक्रिटीकरण करणे या विषयांचा आढावा घेण्यात आला. यावेळी कोरेगावचे आमदार महेश शिंदे, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव तथा विकास आयुक्त डॉ. राजगोपाल देवरा, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओमप्रकाश गुप्ता, ग्रामविकास (रस्ते) विभागाचे सचिव सतीश चिखलीकर, सार्वजनिक बांधकाम (रस्ते) विभागाचे सचिव सदाशिव साळुंके, साताऱ्याचे जिल्हाधिकारी संतोष पाटील (दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे), सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन (दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे), राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे मुख्य अभियंता साहेबराव सुरवसे, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधीक्षक अभियंता राहुल वसईकर, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना व मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचे कार्यकारी अभियंता युवराज देसाई उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com