.jpg?rect=0%2C1%2C1640%2C923&w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
सोलापूर (Solapur) : छोटे इस्टिमेट एकत्रित करून बल्क टेंडर काढू नये. क्लबिंग केलेले टेंडर रद्द करण्यात यावे, अशा मागणीचे निवेदन महापालिका ठेकेदार असोसिएशनच्या वतीने आयुक्तांना देण्यात आले.
महापालिकेमध्ये साधारणपणे ३०० ते ३५० नोंदणीकृत ठेकेदारांपैकी केवळ तीन टक्केच ठेकेदारांची हॉट मिक्स प्लँट व रेडीमिक्स प्लँटची क्षमता आहे. नगर अभियंता विभाग व सार्वजनिक आरोग्य अभियंता विभाग यांच्याकडून छोटी कामे एकत्रित करून क्लबिंग पद्धतीने टेंडर काढण्यात येते. असे न करण्याबाबत न्यायालय व शासनाचे आदेश आहेत. एक इस्टिमेट एक टेंडर अशी प्रक्रिया राबवून टेंडर काढावेत. महापालिकेकडे ९५ टक्के लहान ठेकेदार आहेत. त्यांचा रोजगार हिरावून घेण्याचे काम अधिकारी करत आहेत.
छोटे ठेकेदार हे मुरूम टाकणे, ड्रेनेज लाईन टाकणे, छोटे रस्ते करणे ही कामे करतात. मोठे टेंडर पब्लिश झाले की अटी व शर्ती घालून स्थानिक मक्तेदाराला टेंडरमधून बाद करण्याचे षडयंत्र व बाहेरील कंपनीला मदतीचे कारस्थान सुरू असल्याचा आरोप निवेदनातून केला आहे. नगर अभियंता विभाग व सार्वजनिक आरोग्य अभियंता विभागाकडून लहान कामांचे बेकायदेशीर क्लबिंग करून नियमबाह्य पद्धतीने मोठ्या निविदा काढल्या जात आहेत. हा मुंबई उच्च न्यायालयाचा अवमान आहे. न्याय मिळाला नाही तर उच्च न्यायालयात कायदेशीर दाद मागण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.