वीस वर्षांपासून खड्ड्यांत गेलेल्या सावळीविहीर ते अहिल्यानगर रस्त्याचा फेरा कधी संपणार
शिर्डी (Shirdi) : सावळीविहीर ते अहिल्यानगर या वीस वर्षांपासून खड्ड्यांत गेलेल्या, राष्ट्रीय महामार्गाच्या दुर्दैवाचे फेरे संपायला तयार नाहीत. गेल्या तीन वर्षांत कमी दराने टेंडर भरून दोन ठेकेदार कंपन्या काम अर्धवट सोडून पळून गेल्या. गेल्या महिनाभरात दोनवेळा तातडीने फेरनिविदा जाहीर झाल्या. प्रत्यक्षात आता २६.६३ टक्के कमी दराने टेंडर भरलेल्या कंपनीला हे काम मिळाले. आजवरचा अनुभव लक्षात घेता, ही कंपनी काम पूर्ण करेल का, हा आजवर न सुटलेला प्रश्न पुन्हा उपस्थित झाला आहे. सुदैव एवढेच, या कंपनीला सीमावर्तीय भागातील अवघड आणि मोठी कामे करण्याचा अनुभव आहे.
हा रस्ता काँक्रिटचा व्हावा, अशी इच्छा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली होती. गेल्या वीस वर्षांपासूनचे हे दुखणे दूर व्हावे, यासाठी जिल्ह्यातील आजी-माजी खासदार आणि मंत्र्यांनी त्यांची भेट देखील घेतली. गडकरी यांनीच पुढाकार घेऊन गेल्या महिनाभरात दोनवेळा फेरनिविदा जाहीर करायला लावल्या. दुर्दैव असे की काँक्रिटीकरणाऐवजी हा रस्ता डांबरी ठेवण्याचा अनाकलनीय निर्णय घेण्यात आला. यापूर्वी दोनवेळा रिटेंडर झाले. त्यावेळी एका कंपनीने केवळ बारा टक्के कमी दराने टेंडर भरले होते. कदाचित त्या कंपनीला काम दिले असते, तर काम पूर्ण होण्याची शक्यता वाढली असती. या रस्त्याला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळाला. त्यावेळी दोन ठेकेदार कंपन्या काम अर्धवट टाकून पळून गेल्या. त्यापैकी एकाने २७ टक्के, तर दुसऱ्याने तब्बल ३८ टक्के कमी दराने काम घेतले होते, ते परवडणारे नव्हते. ज्यावेळी हा रस्ता राज्य सरकारकडे होता, त्याकाळात देखील तीन ठेकेदार कंपन्या कमी दराने काम घेऊन पळून गेल्या होत्या. कमी दराने काम घेण्याचे आणि काम अर्धवट टाकून पळून जाण्याचे हे दृष्टचक्र काही केल्या थांबण्याचे नाव घेत नाही.
रस्त्याचे काम अर्धवट स्थितीत बंद पडलेले असल्याने हा रस्ता कमालीचा धोकादायक झाला. अपघातांत बळी जाणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढते आहे. कोल्हारचा एक पूल यापूर्वीच पडला. त्यामुळे जवळपास दररोज वाहतुकीचा खोळंबा आणि वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. या बिकट झालेल्या समस्येतून गेल्या वीस वर्षांपासून मार्ग निघत नाही, हे दुर्दैव आहे. या रस्त्याच्या कडेला आठ ते दहा मोठ्या बाजापेठेची गावे आहेत. दुकानांच्या रांगा वरच्या बाजूला आणि रस्ता खाली, अशी स्थिती निर्माण झाली. त्यामुळे पावसाळ्यात या रस्त्याला काही ठिकाणी अक्षरशः नाल्याचे स्वरूप येते. अशा परिस्थितीत डांबरीकरणाचे काम टिकू शकत नाही. काँक्रिटीकरण हा एकमेव पर्याय असताना पुन्हा डांबरीकरणाची वाट चोखाळली जात आहे. त्यातही कमी दराची निविदा भरून काम सुरू होणार असल्याने पहिले पाढे पंचावन्न, अशी स्थिती निर्माण, तर होणार नाही ना, हा न सुटणारा प्रश्न निर्माण झाला आहे.
कॉंक्रिटीकरण नाहीच
सावळीविहीर ते अहिल्यानगर या महामार्गाचे काम करणाऱ्या ठेकेदार कंपनीला काम पूर्ण झाल्यानंतर पुढील दहा वर्षे रस्त्याची देखभाल करायची आहे. या अटीमुळे कमी दराने टेंडर भरून आणि नंतर काम अर्धवट सोडून पळून जाणाऱ्या कंपन्यांना चाप लागेल, ही आशा फोल ठरली. २६.६३ टक्के कमी दराने निविदा भरणाऱ्या कंपनीला हे काम मिळाले. कमी दराने काम घेणारी ही सातवी कंपनी आहे. रस्त्यांची सध्याची स्थिती पाहता काँक्रिटीकरण ऐवजी स्वीकारलेला डांबरीकरणाचा पर्याय यशस्वी होईल की नाही, हा आणखी एक प्रश्न कायम आहे.