PWDने भर पावसात अंधारात बनविला रस्ता अन् दुसऱ्याच दिवशी...

PWD
PWDTendernama

गोंदवले (Gondawale) : खड्डे पडलेले रस्ते दुरुस्तीसाठी वेळ नसणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाने भर पावसात दहिवडी-फलटण रस्ता बनवला खरा; परंतु दुसऱ्याच दिवशी हा रस्ता वाहून गेल्याने वाहतुकीस अधिकच धोकादायक बनला आहे. लोकांच्या जिवाशी खेळणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करावी व ठेकेदारावर तत्काळ कारवाई करण्याची मागणी प्रवासी व नागरिक करत आहेत.

PWD
Mumbai : महानिर्मिती; 600 मेगावॅट सौर प्रकल्पाच्या टेंडरला मुदतवाढ

विकासात दळणवळणाची महत्त्वाची भूमिका असल्याने शासनाने रस्ते सुधारणेकडे विशेष लक्ष दिले आहे; परंतु या ना त्या कारणाने माण तालुक्यातील अनेक रस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दुर्लक्षित राहिल्याचे पाहायला मिळत आहे; परंतु याला अपवाद ठरवत गेल्या दोन दिवसांपूर्वी दहिवडीजवळ फलटण मार्गावर रात्रीच्या अंधारात, भर पावसात रस्त्याच्या डांबरीकरण करण्यात आले; परंतु दुसऱ्याच दिवशी हा नव्याने डांबरीकरण केलेला रस्ता जागोजागी उखडून गेला. अनेक ठिकाणची खडी उखडून खड्डे पडले, तसेच उखडलेली खडी रस्त्यावर विखुरल्याने वाहने घसरण्याची भीती व्यक्त होत आहे. हा रस्ता डांबरीकरण केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी उखडल्याने वाहतूक अधिकच धोकादायक झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे या परिसरात अपघात झाल्यास जबाबदार कोण? असा सवाल उपस्थित होत आहे.

PWD
Mumbai : Good News! मुंबईकरांचा वेळ वाचणार; सव्वा सहा किमीच्या 'त्या' बोगद्याचे...

पडत्या पावसात हा रस्ता डांबरीकरण करून सार्वजनिक बांधकाम विभागाला नेमकं काय साध्य करायचं होतं? नेहमी दिवसा रस्ता दुरुस्तीचे काम करणारे रात्रीच्या अंधारात रस्त्याच्या नावाखाली कोणता काळा बाजार करत होते? रस्ता बनवल्यावर दुसऱ्याच दिवशी उखडला गेल्याने रस्त्याच्या दर्जाचे काय? असे अनेक सवाल उपस्थित होत आहेत. संबंधित कामाबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने गांभीर्याने विचार करून संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्याची आवश्यकता आहे, तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचीही चौकशी करावी, अशी मागणी प्रवासी व नागरिक करत आहेत.

रात्रीच्या अंधारात तेही भर पावसात रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम करून ठेकेदाराला सहकार्य करून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनीही आपले हात काळे करून घेतल्याचा संशय आहे. या प्रकरणाची वरिष्ठांनी तत्काळ चौकशी करावी, अन्यथा मनसे रस्त्यावर उतरून आंदोलन करेल.

- धैर्यशील पाटील, मनसे जिल्हाध्यक्ष, सातारा

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com