
सोलापूर (Solapur) : सोलापूर जिल्ह्यातील भीमा नदीच्या पात्रातील १३ ठिकाणचा वाळू उपसा, वाळू लिलाव करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने राज्य शासनाच्या पर्यावरण समितीकडे प्रस्ताव पाठविला आहे. या प्रस्तावाला मान्यता मिळाल्यानंतर येथील वाळू लिलावाचा मार्ग मोकळा होणार आहे.
राज्यात २०१९-२० या कालावधीत दोन सरकार सत्तेत होते. वाळूच्या बाबतीत दोन्ही सरकारच्या दोन वेगळ्या भूमिका होत्या. आता राज्यात भाजप महायुतीचे सरकार सत्तेवर येणार आहे. नव्या सरकारचे वाळू धोरण कसे असणार? याबद्दल मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. भीमा नदीवरील खानापूर, कुडल, कवठे, मिरी, तांडोर, बाळगी, भंडाकरवठे, लवंगी, माळेगाव, आलेगाव, टाकळी, गारअकोले, आव्हे आणि नांदोरे या ठिकाणच्या वाळू स्थळांचा लिलाव करण्यास परवानगी मिळावी, असा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने पर्यावरण समितीला पाठविण्यात आला आहे. या समितीची बैठक झाल्यानंतर यातील काही वाळू ठिकाणांच्या लिलावाला परवानगी मिळेल, अशी माहिती महसूल शाखेचे उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर यांनी दिली. भीमा नदीतील वाळूला अधिक मागणी असल्याने येथील वाळू लिलावाकडे संपूर्ण जिल्ह्याचे अधिक लक्ष असते.
सध्या जिल्ह्यात दोन ठिकाणांवरून अधिकृत वाळू उपसा सुरू आहे. यापूर्वी औज, घोडेश्वर, अरळी व देगाव या चार ठिकाणांवरून वाळू उपसा करण्यास परवानगी देण्यात आली होती. त्यापैकी घोडेश्वर व अरळी येथील वाळू उपसा करण्याबाबत त्या-त्या तालुक्यांच्या प्रांताधिकाऱ्यांकडून अहवाल मागविण्यात आला आहे. या अहवालानंतर या दोन ठिकाणांच्या वाळू उपशाबाबत निर्णय घेतला जाणार आहे. तारापूर व उचेठाण/ बठाण येथील वाळू स्थळांच्या लिलावाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. निविदा प्रक्रिया संपली आहे. आता फक्त अंतिम आदेश देणे बाकी आहे.