Ajit Pawar : बारामतीतील 'हा' विषय अजितदादांनी लावला मार्गी! लवकरच...
बारामती (Baramati) : बारामती शहरात जवळपास तीनशेहून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे (CCTV Camera Tender) बसविण्याची टेंडर येत्या आठवडाभरात निघेल, अशी माहिती अतिरिक्त पोलिस अधीक्षक आनंद भोईटे यांनी दिली.
बारामतीत झालेल्य घरफोड्या, चोऱ्या व इतर काही प्रकारानंतर स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सीसीटीव्ही कॅमेरे लवकर बसविण्याबाबत पुढाकार घेतला आहे. या संदर्भात बुधवारी (ता. २३) मंत्रालयात एक उच्चस्तरीय बैठक पार पडली. यामध्ये बारामतीतील सीसीटीव्ही कॅमेरे जलदगतीने बसविण्याबाबत लवकरच टेंडर प्रक्रीया सुरू करण्याचा निर्णय झाला आहे. आनंद भोईटे हेही या बैठकीस उपस्थित होते.
बारामतीत मध्यंतरी एकाच दिवशी सोळा ठिकाणी घरफोडी झाल्या. त्याच्या नंतरही अनेक ठिकाणी चोऱ्यांचे प्रकार घडले. वाहनचोरीसह इतरही काही अनुचित घटनांच्या पार्श्वभूमीवर सीसीटीव्ही बसविल्यास अशा घटना रोखण्यासाठी त्याचा उपयोग होऊ शकतो, त्या दृष्टीने आता याबाबत वेगाने प्रक्रीया सुरू झाली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून या प्रकल्पाची फाईल मंत्रालयात पडून होती, मात्र अजित पवार यांनी लक्ष घालून आता पुढील प्रक्रिया सुरू केल्याने हा प्रकल्प लवकर मार्गी लागेल, अशी चिन्हे आहेत.
प्रारंभी कमी कॅमेऱ्याचा प्रस्ताव सादर केला होता. कालांतराने बारामती नगरपालिकेची हद्दवाढ झाली व अनेक ठिकाणांवर नजर ठेवण्यासाठी अधिक व्यापक प्रकल्पाची गरज पोलिस विभागाने बोलून दाखविल्यानंतर हा प्रकल्प पुन्हा विस्तारीत केला. पण, तो वेळेत मार्गी लागू शकला नव्हता.
असा असेल प्रकल्प....
• ३२० अत्याधुनिक कॅमेऱ्यांच्या माध्यमातून शहरावर नजर असेल.
• एकाच नियंत्रण कक्षात बसून प्रत्येक हालचालीवर नजर ठेवली जाणार आहे.
• २०० कॅमेरे हे कायमस्वरुपी लावले जाणार असून, उर्वरित १२० कॅमेरे हे फेस रेकनिग्नेशेन प्रणालीचे असतील.
• पॅरारोमिक, पीटीझेड तसेच एएनपीआर व ड्रोन कॅमेरेही लावण्याचे नियोजन.
• एखाद्या व्यक्तीचा स्पष्ट चेहरा दिसण्यासह वाहनांची नंबरप्लेट अचूक समजेल.
• परदेशाच्या धर्तीवर ही प्रणाली विकसीत केली जाणार.
• एखाद्या चौकात काही सूचना द्यायच्या असतील तर त्या नियंत्रण कक्षात बसून पोलिस देऊ शकतील.
• शहरातील प्रत्येक वाहनावर व व्यक्तीवर नजर ठेवता येणार आहे. अनेकदा वाहनचोरी, भांडणे, चोऱ्या या घटनात या कॅमेऱ्यांची भूमिका महत्वाची असेल.