
पुणे (Pune) : निवासी, व्यापारी व औद्योगिक बांधकामे शहरात वाढत आहेत. त्या पार्श्वभूमीवर महापालिका अग्निशामक दलही सक्षम केले जात आहे. सध्या आठ केंद्र असून, पुनावळे, दिघी, चऱ्होली, एमआयडीसी एफ-२ ब्लॉक भोसरी अशी चार केंद्र प्रस्तावित आहेत. नवीन केंद्रांची उभारणी, बंब व अन्य वाहनांची खरेदी, मनुष्यबळ भरती केली जात आहे. या महिन्यातील दोन स्थायी समिती सभांमध्ये तब्बल २९ वाहने खरेदीस प्रशासक शेखर सिंह यांनी मंजुरी दिली आहे. त्यात अग्निशामक बंबांसह ७० मीटर उंच शिडी व पूरस्थितीत उपयुक्त वाहनांचाही समावेश आहे.
भोसरी, पिंपरी, चिंचवड एमआयडीसी (औद्योगिक क्षेत्र) सर्वात मोठे क्षेत्र शहरात आहे. शिवाय, चऱ्होली, वडमुखवाडी, दिघी, मोशी, कुदळवाडी, चिखली, जाधववाडी, ज्योतिबानगर तळवडे, कासारवाडी, दापोडी, फुगेवाडी, ताथवडे, थेरगाव, पुनावळे, नेहरूनगर आदी भागातही काही लघुउद्योग, वर्कशॉप व छोटे उद्योग आहेत.
गावठाणांमध्ये अरुंद गल्ल्या, चाळी आहेत. पिंपळे सौदागर, वाकड, पिंपळे निलख, चऱ्होली, मोशी, चिखली भागात मोठमोठ्या इमारती, गृहसंकुले, शैक्षणिक संकुले होत आहेत. ताथवडे, पुनावळे भागात २२ मजल्यांपर्यंतच्या निवासी इमारतींना परवानगी दिली आहे. शिवाय, १९९७ मध्ये समाविष्ट झालेल्या भागात आता मोठ्या प्रमाणात वस्ती वाढत आहे. त्यामुळे महापालिकेचा अग्निशामक विभाग आणखी सक्षम करणे आवश्यक आहे.
बदलत्या शहरीकरणामुळे अग्निशामक अथवा नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्ती निवारणासाठी अत्याधुनिक यंत्रणा असणे आवश्यक आहे. त्यादिशेने महापालिकेने पावले टाकली आहेत. नवीन अग्निशामक केंद्र कार्यान्वित केली आहेत. बुधवारी (ता. २३) झालेल्या स्थायी समिती सभेत तीन वॉटर कॅनन, सहा फायर टेंडर आणि दोन ॲडव्हान्स रेस्क्यू टेंडर अशी ११ वाहने खरेदीस प्रशासक शेखर सिंह यांनी मंजुरी दिली. पंधरा दिवसांपूर्वी विविध प्रकारची १८ वाहने खरेदीस आणि त्यासाठीच्या १३२ कोटी ६१ लाख रुपयांच्या खर्चासही मंजुरी दिली आहे.
अग्निशामकची वाटचाल
पिंपरी, चिंचवड, भोसरी, आकुर्डी, निगडी या गावांची मिळून १९७२ मध्ये नगरपालिका अस्तित्वात आली. त्यानंतर २० जुलै १९७३ रोजी मुख्य अग्निशामक केंद्राची स्थापना झाली. त्यानंतर भोसरी, प्राधिकरण, रहाटणी, तळवडे, चिखली, थेरगाव व मोशी असे आठ केंद्र टप्प्याटप्प्याने सुरू झाले. पुनावळे, दिघी, चऱ्होली, एमआयडीसी एफ दोन ब्लॉक भोसरी असे चार केंद्र प्रस्तावित आहेत.
दृष्टिक्षेपात अग्निशामक केंद्र
कार्यरत ः ८
प्रस्तावित ः ४
कार्यरत वाहने ः २८
प्रस्तावित वाहने ः १८
दृष्टिक्षेपात मनुष्यबळ
मंजूर पदे ः ४४५
भरलेली पदे ः ८५
रिक्त पदे ः ३६०