
अहिल्यानगर (Ahilyanagar) : अहिल्यानगर शहर महापालिका हद्दीतील सर्व मालमत्तांचे महापालिकेमार्फत सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. याद्वारे महापालिका क्षेत्रातील सर्व जागा व मालमत्तांची, इमारतींची, घरांची मोजमापे घेऊन मूल्यांकन करण्यात येणार आहे. मार्च अखेरीपर्यंत हे काम पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत.
सर्व्हेक्षण करताना अडचणी येत आहेत. नागरिकांनी सर्वेक्षण करणाऱ्या खासगी संस्थेच्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे. त्यांच्याकडे ओळखपत्र आहेत. ते तपासून त्यांना सर्वेक्षणासाठी सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी केले आहे. गुरुवारी महानगरपालिकेत डांगे यांनी सर्वेक्षणाचा आढावा घेतला. अहिल्यानगर महापालिका हद्दीतील सर्व जमीन व इमारती यांचे सर्वेक्षण करुन आवश्यक माहिती संकलीत करणे, मूल्यांकन व आवश्यक तांत्रिक सेवा संगणकीकरण करणे, विविध आज्ञावली विकसीत करुन इतर कामे करणे, यासाठी निविदा प्रसिध्द करण्यात आली होती. त्यानुसार महापालिका प्रशासनाकडून मे. सी. ई. इन्फो सिस्टीम प्रायव्हेट लिमिटेड यांना कार्यारंभ देण्यात आला आहे. मालमत्तेची डिजिटल छायाचित्रे, जिओ टॅगींग, तसेच मालमत्तेच्या अंतर्गत मोजमापांसाठी, त्यांचे कारपेट व बिल्टअप क्षेत्र डिजिटल उपकरणाद्वारे मोजण्यात येणार आहे. महानगरपालिकेचे वसुली लिपिक व मे. सी. ई. इन्फो सिस्टीम लिमिटेड यांच्या प्रतिनिधीच्या उपस्थितीत हे काम केले जात आहे. त्यासाठी वसुली लिपिक व वसुली मदतनीस आदींची नियुक्ती करण्यात आली आहे.
खासगी संस्थेचे कर्मचारी असल्याने काही नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होऊन सर्वेक्षणात अडथळे येत आहेत. मालमत्ताधारकांनी मालमत्ता सर्वेक्षणासाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांची ओळख तपासून त्यांना सहकार्य करावे. त्यांना आवश्यक ती माहिती द्यावी. सर्वेक्षणाचे काम हे अहिल्यानगर महापालिका विनामूल्य करत आहे. यासाठी कुठलेही शुल्क आकारण्यात येणार नसल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
मुलभूत सुविधांमध्ये सुधारणा शक्य
सर्वेक्षणामुळे सर्व मालमत्तांना कर आकारणी होईलच. मात्र, यामुळे मालमत्ताधारकांना आवश्यक असलेल्या मुलभुत सुविधांमध्ये सुधारणा करणे शक्य होणार आहे. या सर्व्हेक्षणाबाबत अथवा सर्वेक्षण कामास येणाऱ्या कर्मचारी, प्रतिनिधींबाबत कुठलीही तक्रार असल्यास amc_anr@rediffmail.com व amc.revision2@gmail.com या ई-मेल आयडी वर तक्रार करावी. याबाबत सहाय्यक मूल्य निर्धारक कर संकलन अधिकारी विनायक गंगाधर जोशी यांच्याशी ९८२२०७६८६५ या मोबाईल क्रमांकावर संपर्क करता येईल, असेही आयुक्त यशवंत डांगे यांनी म्हटले आहे.