
मुंबई, ता. १७ : देशभरातील ‘वंदे भारत’ एक्स्प्रेस (vande bharat express) एकूण क्षमतेपेक्षा कमी म्हणजेच सरासरी ताशी ९०-९५ किलोमीटर वेगाने चालवली जात असल्याने प्रवाशांनी या महागड्या एक्स्प्रेसकडे पाठ दाखवणे सुरू केले. त्याची प्रचिती महाराष्ट्रात दिसून येत आहे.
पंतप्रधानांच्या हस्ते सुरू झालेल्या महाराष्ट्रातील चौथ्या नागपूर-बिलासपूर वंदे भारत एक्स्प्रेसला प्रवाशांच्या अल्प प्रतिसादामुळे डब्याची संख्या कमी करण्याचा निर्णय घ्यावा लागला आहे. त्यामुळे १६ डब्यांऐवजी आता नागपूर-बिलासपूर वंदे भारत एक्स्प्रेस केवळ आठ डब्यांसहच चालविण्यात येणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ११ डिसेंबर २०२२ रोजी महाराष्ट्रातील चौथ्या नागपूर-बिलासपूर वंदे भारत एक्स्प्रेसचे उद्घाटन झाले होते. ही एक्स्प्रेस छत्तीसगडमधील बिलासपूर आणि महाराष्ट्रातील नागपूरला जोडते. विशेष म्हणजे बिलासपूर आणि नागपूर ही दोन्ही शहरे व्यवसायाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाची शहरे आहेत. या दोन शहरांमधून दररोज मोठ्या संख्येने लोक ये-जा करतात.
‘वंदे भारत’च्या एक्झिक्युटिव्ह क्लासचे भाडे दोन हजार ४५ रुपये आणि चेअर कारचे भाडे १ हजार ७५ रुपये आहे. नागपूर-बिलासपूर ‘वंदे भारत’चा वेग ७८ किलोमीटर प्रतितास आहे. या एक्स्प्रेसला पोहोचण्यास साडेपाच तास लागतात. इतर मेल-एक्सप्रेस गाड्यांनाही साधारणतः साडेपाच ते सहा तास लागतात. त्यामुळे वेळेची बचत होत नसून, पैसेही जास्त लागत असल्याने नागपूर-बिलासपूर ‘वंदे भारत’कडे प्रवाशांनी पाठ फिरवण्यास सुरुवात केली आहे. दैनंदिन अल्प प्रतिसादामुळेच रेल्वे प्रशासनाने ही एक्स्प्रेस १६ डब्यांऐवजी आठ डब्यांसह चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
काय म्हणते रेल्वे?
मध्य रेल्वेच्या एक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले, की नागपूर-बिलासपूर वंदे भारत एक्स्प्रेसचा रेक सिकंदराबाद-तिरुपती वंदे भारत एक्स्प्रेसच्या रेकसोबत जोडला जात आहे. सिकंदराबाद-तिरुपती वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये जास्त प्रवासी आणि प्रतिक्षा यादी आहे. या कारणास्तव, प्रवाशांच्या सोयीसाठी आणि सिकंदराबाद-तिरुपती वंदे भारत एक्सप्रेससाठी अधिक डब्यांसह रेकची आवश्यकता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.
‘वंदे भारत’चा वेग कागदावरच?
सध्या देशभरात १६ मार्गांवर वंदे भारत एक्स्प्रेस धावत आहे. या एक्स्प्रेसची ताशी १८० किलेमीटर वेगाने धावण्याची क्षमता आहे. ही एक्स्प्रेस वेगाने धावावी म्हणून प्रत्येक दोन डब्यांसाठी तब्बल ४५० हॉर्स पॉवरच्या (अश्वशक्ती) इलेक्ट्रिक मोटार लावल्या आहेत.
ही एक्स्प्रेस तांत्रिकदृष्ट्या वेगाने धावण्यास सक्षम असली तरी सध्याच्या रूळांची क्षमता पाहता ती जास्तीत जास्त ताशी १२० किलोमीटर वेगाने चालवली जात आहे; मात्र या गाडीचा सरासरी वेग जास्तीत जास्त ९५ किलोमीटरच असल्याची माहिती रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
वंदे भारतचा सरासरी ताशी वेग
नवी दिल्ली-वाराणसी : ९६ किमी
हजरत निजामुद्दीन-राणी कमलापती : ९५.८९ किमी
चेन्नई-कोइमतूर : ९०.३६ किमी
नवी दिल्ली-अम्बा अंदाऊरा : ८५ किमी
सिकंदराबाद-विशाखापट्टणम : ८४ किमी
गांधीनगर-मुंबई सेंट्रल : ८३.८७ किमी
अजमेर-दिल्ली : ८३ किमी
नवी दिल्ली-श्री माता वैष्णोदेवी कटरा : ८२ किमी
सिकंदराबाद-तिरूपती : ७९ किमी
नागपूर-बिलासपूर : ७८ किमी
हावडा-न्यू जलपिगुरी : ७६.८४ किमी