
मुंबई (Mumbai): महाराष्ट्रासह देशातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या अष्टविनायकांच्या मंदिर परिसरात सुरू असणारी विकासाची कामे वेळेत व दर्जेदार पध्दतीने पूर्ण करण्यात यावीत.
या विकास आराखड्यांतर्गत काम करताना मंदिरांच्या मूळ आराखड्याला कोणताही धक्का न लावता प्रत्येक कामाला ‘हेरिटेज टच’ द्यावा. श्री अष्टविनायक मंदिर विकास आराखडा भाविकांना दर्जेदार सोयी देण्याबरोबरच महाराष्ट्रातील पर्यटनवाढीसह अर्थव्यवस्थेला नवे बळ देणारा ठरेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी व्यक्त केला.
श्री अष्टविनायक मंदिर परिसर विकास आराखडा कामांची आढावा बैठक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील त्यांच्या समिती कक्षात झाली. यावेळी पवार म्हणाले, राज्यातील अष्टविनायकांपैकी मयुरेश्वर (मोरगाव), चिंतामणी गणपती (थेऊर), विघ्नेश्वर (ओझर), महागणपती (रांजणगाव), वरदविनायक (महड), सिद्धिविनायक (सिद्धटेक) आणि बल्लाळेश्वर (पाली) या मंदिरांच्या परिसरात सुरू असणारी विकासाची कामे वेळेत व दर्जेदार पध्दतीने करण्यात यावीत. मंदिराच्या मूळ आराखड्याला कोणताही धक्का न लावता काम करण्यात यावे.
अष्टविनायक मंदिर परिसरात राहणाऱ्या स्थानिक रहिवाशांना पर्यायी जागा देऊन त्यांचे योग्य पुनर्वसन करण्यात यावे, मंदिर परिसरात अधिक मोकळी जागा उपलब्ध करावी. मूळ मंदिराशी विसंगत ठरणारी परिसरातील बांधकामे काढून टाकून आपत्कालीन स्थितीत मंदिर परिसरात अॅम्ब्युलन्ससह अग्निशमन गाड्या सहज जाऊ शकतील अशी मार्गव्यवस्था ठेवण्यात यावी.
पर्यटनाच्या दृष्टीने महाराष्ट्राला प्रचंड संधी असून पर्यटनाची अर्थव्यवस्था उभी करण्यासाठी ठोस पावले उचलण्यावर भर द्यावा. केरळ, ओडिशा यांसारख्या राज्यांच्या धर्तीवर विदेशी पर्यटक, परराज्यातील भाविक आणि नवी पिढीला आकर्षित करण्यासाठी आधुनिक सोयीसुविधा, उच्च दर्जाच्या सेवा व पर्यटनाभिमुख उपक्रमांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.
यावेळी वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. राजेश देशमुख, पुरातत्व व वस्तुसंग्रहालय, मुंबईचे संचालक तेजस गर्गे, पुरातत्व व वस्तुसंग्रहालय, पुणेचे सहायक संचालक विलास वाहणे, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक निलेश गटणे यांच्यासह
दूरदृश्य प्रणालीद्वारे पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे, अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी उपस्थित होते.