

मुंबई (Mumbai): मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांतील लाखो प्रवाशांसाठी एक अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि मोठा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे.
मुंबई महानगर प्रदेशातील वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी 'रामबाण' उपाय ठरू शकणाऱ्या उत्तन-वसई-विरार सी लिंक प्रकल्पाला अखेर पर्यावरण विभागाने अंतिम मान्यता दिली आहे. यामुळे वेस्टर्न एक्सप्रेस वे आणि लोकल ट्रेनवरील ताण मोठ्या प्रमाणात कमी होऊन मुंबई महानगर प्रदेशातील दळणवळणाचे चित्र पूर्णपणे बदलणार आहे.
सुरुवातीला प्रकल्पाचा खर्च ८७ हजार कोटी रुपये होता. मात्र, सुधारित तांत्रिक आणि अभियांत्रिकी मूल्यांकनानंतर, मार्गिकांची संख्या कमी करून (तीन अधिक तीन लेन) आणि स्तंभांची रचना बदलून हा खर्च आता ५२,६५२ कोटी पर्यंत खाली आणण्यात आला आहे.
सध्या वसई-विरारसह डहाणू परिसरातील नागरिकांना रोज मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील प्रचंड वाहतूक कोंडीचा आणि जीवघेण्या प्रवासाचा सामना करावा लागतो. या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा म्हणून विरार ते थेट मरीन ड्राईव्हपर्यंतचा प्रवास अखंडित आणि सिग्नल-फ्री करण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.
सध्या वर्सोवा ते विरार हे अंतर पार करण्यासाठी जवळपास दोन तासांचा वेळ लागतो, जो या प्रकल्पामुळे केवळ ४५ मिनिटांत पूर्ण होईल, असा अंदाज आहे.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत साकारला जाणारा हा ५५.१२ कि.मी. लांबीचा सागरी पूल प्रकल्प केवळ पूल नसून, अनेक महत्त्वाच्या मार्गांना जोडणारा एक विस्तृत कॉरिडॉर आहे.
या कनेक्टिव्हिटीमुळे, दहिसर-भाईंदर कोस्टल रोड आणि वर्सोवा कोस्टल रोडच्या माध्यमातून, थेट मरीन ड्राईव्ह (दक्षिण मुंबई) पासून प्रवास सुरू करून विरारपर्यंत नॉन-स्टॉप प्रवास करणे शक्य होणार आहे. जायका (जपान इंटरनॅशनल को-ऑपरेशन एजन्सी) कडून ७२.१७% (पथकर वसुलीच्या आधारे परतफेड) आणि महाराष्ट्र सरकार/एमएमआरडीए कडून २७.८३% भांडवल पुरवले जाणार आहे.
हा सागरी पूल केवळ स्थानिक वाहतुकीसाठीच नाही, तर राष्ट्रीय अर्थव्यवस्थेसाठीही महत्त्वाचा आहे. हा पूल वडोदरा-मुंबई द्रुतगती मार्ग आणि महत्त्वाकांक्षी वाढवण बंदर (पालघर) या दोन्हीशी थेट जोडला जाणार आहे. यामुळे मुंबईच्या उत्तर उपनगरांचा दिल्ली-मुंबई औद्योगिक कॉरिडॉरशी थेट संपर्क साधला जाईल, जो प्रादेशिक आणि राष्ट्रीय विकासासाठी गेमचेंजर ठरणार आहे.
पर्यावरण विभागाकडून मंजुरी मिळाली असली तरी, त्यामुळे काही प्रमाणात खारफुटी आणि वनजमिनीवर परिणाम होणार आहे. आता ही मंजुरी मिळाल्यानंतर प्रकल्पाची अंमलबजावणी जलदगतीने करण्यासाठी विशेष उद्देश वाहन स्थापन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
असा आहे प्रकल्प...
या निर्णयामुळे मुंबई महानगर प्रदेशाच्या पायाभूत सुविधांच्या विकासात एका नवीन पर्वाची सुरुवात झाली आहे.
प्रकल्पाची एकूण लांबी: ५५.१२ कि.मी.
मुख्य सागरी पूल: २४.३५ कि.मी. (उत्तन ते विरार दरम्यान समुद्रावरून जाणारा)
एकूण कनेक्टर्स: ३०.७७ कि.मी.
महत्वाचे कनेक्टर्स:
उत्तन कनेक्टर (९.३२ कि.मी.): हा मार्ग वर्सोवा-भायंदर-दहिसर कोस्टल रोडशी जोडला जाईल.
वसई कनेक्टर (२.५० कि.मी.): हा पूर्णपणे उन्नत मार्ग असेल.
विरार कनेक्टर (१८.९५ कि.मी.): हा मार्ग थेट दिल्ली-मुंबई एक्स्प्रेसवेशी (वडोदरा-मुंबई द्रुतगती मार्ग) जोडला जाईल.