

मुंबई (Mumbai): मुंबई आणि मुंबई महानगर परिसरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी मुंबई महापालिकेने हाती घेतलेल्या वेसावे-भाईंदर उन्नत मार्गामुळे प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. हा मार्ग प्रवाशांच्या सेवेत आल्यानंतर सध्या सुमारे १२० मिनिटांचा असलेला प्रवास १५ ते २० मिनिटांत पूर्ण करता येणार आहे.
मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी बुधवारी या प्रकल्पाच्या कामांची पाहणी केली. प्रकल्पाचे काम गुणवत्तापूर्ण पद्धतीने आणि निर्धारित वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. यावेळी प्रमुख अभियंता (रस्ते व वाहतूक) मांतय्या स्वामी, कार्यकारी अभियंता वैभव गांधी, संबंधित अभियंते आणि सल्लागार उपस्थित होते.
मुंबई महानगरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी तसेच सुसह्य आणि अखंड प्रवासासाठी महापालिकेने मुंबई किनारा रस्ता (उत्तर) हा महत्त्वाकांक्षी पायाभूत सुविधा प्रकल्प हाती घेतला आहे. आंतरबदल आणि जोडरस्त्यांसह हा मेगा प्रकल्प सुमारे ६० किलोमीटरचा असून, त्याद्वारे वेसावे आणि भाईंदर ही नगरे किनारा रस्त्याने जोडली जाणार आहेत.
ट्विन टनेलचे कामही वेगाने
पॅकेज 'सी'मध्ये माईंडस्पेस मालाड ते चारकोप खाडी दरम्यान उत्तर दिशेने जाणाऱ्या ३.९ किलोमीटर लांबीच्या बोगद्याचा समावेश आहे. पॅकेज 'डी'मध्ये चारकोप खाडी ते माईंडस्पेस मालाड दरम्यान दक्षिण दिशेने जाणाऱ्या ३.९ किलोमीटर लांबीच्या जुळ्या बोगद्यांचा समावेश आहे. बांगर यांनी या दोन्ही पॅकेजअंतर्गत सुरू असलेल्या कामांची पाहणी केली.
चारकोप येथे बोगद्याच्या बांधकामासाठी शाफ्ट उभारण्यात येणार आहे. त्यासाठी ६५ मीटर × ४० मीटर क्षेत्रफळाच्या जागेवर खोदकाम सुरू असून पायलिंगचे कामही सुरू आहे. बोगदा खणन यंत्राचे (टीबीएम) सुटे भाग डिसेंबर २०२६मध्ये उपलब्ध होणार आहेत. त्यानंतर पुढील दोन महिन्यांत टीबीएमच्या सुट्या भागांची जुळवाजुळव प्रक्रिया पूर्ण करून बोगद्याचे खोदकाम सुरू करणे अपेक्षित आहे. दुसऱ्या बोगदा खनन यंत्राची जुळवाजुळव पूर्ण करून दुसऱ्या बोगद्याचे खोदकाम सुरू करण्याचेही नियोजन आहे.
सात टप्प्यांत प्रकल्पाची उभारणी
मुंबई किनारा रस्ता (उत्तर) प्रकल्पाची उभारणी ए, बी, सी, डी, ई, एफ आणि दहिसर-भाईंदर जोडरस्ता (डीबीएलआर) अशा सात टप्प्यांत विभागण्यात आली आहे.
या प्रकल्पात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून दुहेरी उन्नत मार्ग, खारफुटी क्षेत्रातील खांबांवरील रस्ता, दोन केबल आधारित पूल, चार बास्केट पूल, सुमारे १५ मीटर व्यासाचे दोन जुळे बोगदे (ट्विन टनेल) आणि १० आंतरबदल (इंटरचेंज) अशा विविध पायाभूत सुविधा उभारण्यात येणार आहेत.
Key Points
वेसावे-भाईंदर उन्नत मार्गामुळे प्रवासाचा वेळ कमी होणार
सध्याचा १२० मिनिटांचा प्रवास १५ ते २० मिनिटांत होण्याचा दावा
मुंबई किनारा रस्ता (उत्तर) प्रकल्पाची लांबी आंतरबदल व जोडरस्त्यांसह सुमारे ६० किलोमीटर
वेसावे आणि भाईंदर ही नगरे किनारा रस्त्याने जोडली जाणार
पॅकेज 'सी'मध्ये ३.९ किलोमीटर लांबीचा बोगदा
पॅकेज 'डी'मध्ये ३.९ किलोमीटर लांबीचे जुळे बोगदे
चारकोप येथे बोगद्याच्या बांधकामासाठी शाफ्ट उभारला जाणार
टीबीएमचे सुटे भाग डिसेंबर २०२६मध्ये उपलब्ध होणार
प्रकल्पाची उभारणी सात टप्प्यांत करण्यात येणार
दोन केबल आधारित पूल आणि चार बास्केट पूल उभारणार
सुमारे १५ मीटर व्यासाचे दोन ट्विन टनेल प्रस्तावित
प्रकल्पात १० इंटरचेंज उभारले जाणार