
मुंबई (Mumbai) : वसई (Vasai) शहरातील प्रदूषण कमी करून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वसई विरार महापालिकेने (Vasai-Virar Municipal Corporation) ७२ कोटी खर्चातून विविध उपाययोजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत हवा शुद्धीकरणाची यंत्रे, मियावाकी उद्यान, गॅसदाहिन्या, दुभाजक उद्यान, फवारे कारंजे तसेच रस्त्याच्या कडेचे डांबरीकरण करण्यात येणार आहेत.
राष्ट्रीय शुद्ध हवा कार्यक्रमांतर्गत शहरातील प्रदूषण रोखून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी केंद्र शासनाने विविध उपाययोजना करण्याचे निर्देश महापालिकांना दिले आहेत. त्यानुसार महापालिकांना निधी उपलब्ध करून दिला जात आहे. आतापर्यंत वसई विरार महापालिकेला ७२ कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. त्यानुसार महापालिकेने कामांना सुरुवात केली आहे.
याअंतर्गत महापालिकेने ६ ठिकाणी फवारे असलेले कारंजे लावले आहेत. मार्चअखेपर्यंत १४ ठिकाणी अशा प्रकारची कारंजे बसविण्यात येणार आहेत. या पाण्यामुळे परिसरातील धूळ कमी होऊन थंडावा राहण्यास मदत होणार आहे. याशिवाय हवा शुद्धीकरणाची यंत्रे बसविण्यात येणार आहेत. जपानी तंत्रज्ञानाचा वापर करून मियावाकी उद्याने तयार केली जात आहेत. कौल सिटी आणि पाचूबंदर येथे तीन उद्यानांचे काम सुरू असल्याची माहिती महापालिकेचे उपायुक्त आणि स्वच्छ हवा कार्यक्रमाचे नोडल अधिकारी किशोर गवस यांनी दिली.
महापालिकेने दुभाजक उद्यान तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. रस्त्यांच्या मध्ये असलेल्या जागेचे सुशोभीकरण करून तेथे शोभिवंत झाडे लावून हे उद्यान तयार केले जाणार आहे. त्यासाठी अडीच कोटी रुपयांची तरतूद आहे. रस्त्याच्या कडेला असलेली धूळ, मातीचे प्रदूषण रोखण्यासाठी त्या ठिकाणी डांबरीकरण केले जाणार आहे. यामुळे रस्त्यालगतचा परिसर स्वच्छ आणि धूळीचे प्रदूषण कमी होईल, असा विश्वास महापालिका आयुक्त अनिलकुमार पवार यांनी व्यक्त केला. रस्ता स्वच्छ करण्याचे स्वयंचलित वाहन याआधी खरेदी केले आहे. आता आणखी एक सव्वा कोटींचे स्वयंचलित यंत्र विकत घेण्याचा निर्णय झाला आहे. प्रदूषण कमी करण्यासाठी तसेच हवेची गुणवत्ता वाढविण्यासाठी महापालिका प्रयत्नशील असून केंद्राकडून टप्प्याटप्प्याने निधी मिळत आहे. त्यानुसार विविध कामांना सुरुवात झाली असून मार्चपर्यंत पहिल्या टप्प्यातील कामे पूर्ण केली जाणार आहेत.