

मुंबई (Mumbai): वसई-विरार शहर महानगरपालिका क्षेत्रातील आरोग्य यंत्रणेवर असलेला वाढता ताण कमी करण्यासाठी आणि सर्वसामान्य नागरिकांना स्थानिक पातळीवरच दर्जेदार उपचार मिळावेत यासाठी महापालिकेने एक मोठे पाऊल उचलले आहे. आचोळे येथे उभारण्यात येणाऱ्या ४०० खाटांच्या अद्ययावत रुग्णालयासाठी अखेर टेंडर प्रक्रिया सुरू झाली असून, यामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला हा प्रकल्प आता प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या टप्प्यावर पोहोचला आहे.
वाढती लोकसंख्या आणि गंभीर आजारांच्या उपचारांसाठी मुंबईवर अवलंबून राहण्याची गरज लक्षात घेता, हे रुग्णालय या भागातील गरीब आणि गरजू रुग्णांसाठी खऱ्या अर्थाने वरदान ठरणार आहे. हे रुग्णालय आणि इतर सोयीसुविधांसाठी सुमारे ४०० ते ५०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
या रुग्णालयाचा प्रवास सोपा नव्हता. जमिनीच्या कायदेशीर तिढ्यामुळे हा प्रकल्प प्रदीर्घ काळ रखडला होता. ज्या भूखंडावर रुग्णालय प्रस्तावित होते, तिथे सत्र न्यायालय आणि न्यायाधीश निवासस्थान बांधण्याचे नियोजन सार्वजनिक बांधकाम विभागाने केले होते.
यापूर्वी तीन वेळा या रुग्णालयाचे भूमिपूजन होऊनही तांत्रिक अडचणींमुळे कामाला गती मिळू शकली नव्हती. मात्र, आता सर्व अडथळे दूर झाले असून प्रशासनाने टेंडर प्रसिद्ध केल्याने लवकरच कंत्राटदाराची निवड होऊन बांधकामाला सुरुवात होणार आहे. महापालिका आयुक्त मनोज सूर्यवंशी यांनी या प्रकल्पाला गती दिली असून, निश्चित कालमर्यादेत हे रुग्णालय पूर्ण करण्यावर प्रशासनाचा भर आहे.
आचोळे येथील भूखंड क्रमांक ६ वर उभे राहणारे हे रुग्णालय सात मजल्यांचे असून त्याचे एकूण क्षेत्रफळ ४४१४४.६० चौरस मीटर इतके भव्य असेल. आधुनिक गरजा लक्षात घेऊन इमारतीच्या रचनेत दोन तळमजल्यांचा समावेश करण्यात आला आहे, जिथे २५० चारचाकी, १०० दुचाकी आणि १० रुग्णवाहिकांच्या पार्किंगची प्रशस्त व्यवस्था केली जाणार आहे.
या रुग्णालयाची रचना रुग्णांच्या विविध गरजा लक्षात घेऊन करण्यात आली आहे. तळमजल्यावर १६ खाटांचा आपत्कालीन विभाग, सीटी स्कॅन, क्ष-किरण आणि अद्ययावत ओपीडीची सोय असेल, तर पहिल्या मजल्यावर विशेषतः कॅन्सर रुग्णांसाठी केमोथेरपी आणि डायलिसिस सारख्या सुविधांसह एमआरआय आणि ब्लड बँक उपलब्ध करून दिली जाईल.
रुग्णालयाच्या वरच्या मजल्यांवर विशेष उपचारांची सोय असेल, ज्यात आयव्हीएफ सेंटर, हृदयविकाराच्या रुग्णांसाठी स्वतंत्र विभाग आणि अत्याधुनिक शस्त्रक्रिया गृहांचा समावेश आहे. तिसऱ्या आणि पाचव्या मजल्यावर सामान्य वॉर्डसह खाजगी रूम्सची व्यवस्था करण्यात आली असून, सातव्या मजल्यावर अतिदक्षता विभाग (ICU) आणि रिकव्हरी रूम्स असतील.
प्रशासकीय कामांसाठी आणि डॉक्टरांच्या प्रशिक्षणासाठी सहाव्या मजल्यावर कॉन्फरन्स रूम आणि ग्रंथालयाची सोय असेल. या एकाच छताखाली सर्व प्रकारच्या आरोग्य सुविधा मिळणार असल्याने वसई-विरारमधील नागरिकांना आता उपचारांसाठी मुंबईला धाव घेण्याची गरज उरणार नाही. स्थानिक स्तरावर आरोग्य व्यवस्था बळकट झाल्यामुळे सामान्य नागरिकांचा वेळ आणि पैसा दोन्हींची बचत होणार आहे.