
मुंबई (Mumbai): भिवंडी तालुक्यातील येवई-चिंचवली-पाच्छापूर तानसा पाईप लाईनच्या देखभाल दुरुस्तीसाठी २५.५७ किमी लांबीचा सेवा रस्ता बृहन्मुंबई महापालिकेच्या अखत्यारीत आहे. या रस्त्याचे काँक्रिटीकरण दोन टप्प्यात करण्याबाबत बृहन्मुंबई महापालिका आयुक्तांना सूचना दिल्या जातील, असे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.
विधानसभा सदस्य शांताराम मोरे यांनी येवली - चिंचवली-पाच्छापूर तानसा पाईपलाईनवरील रस्त्याचे कामाबाबत विधानभेत लक्षवेधी सूचना मांडली.
उद्योग मंत्री सामंत यांनी सांगितले, मुंबई शहराला पाणीपुरवठा करण्याकरिता तानसा धरणातून केलेल्या जलवाहिन्या या भिवंडी तालुक्यातील अनेक गावातून जातात. या जलवाहिन्यांच्या परीक्षण, देखभाल दुरुस्तीकरता सेवा रस्ते महापालिकेद्वारे बांधण्यात आले आहेत. या सेवा रस्त्यांची दुरुस्ती महापालिकेमार्फत नियमित केली जाते. या रस्त्यावरून अवजड वाहनांची वाहतूक होत असल्याने रस्ता वारंवार नादुरुस्त होतो.
या रस्त्यावरील अवजड वाहनांची वाहतूक असल्याने या रस्त्याचे कॉंक्रिटीकरणाचे काम या वर्षी १२.५ किमीचे आणि पुढील वर्षी १२.५ किमीचे काम करण्याबाबत सूचना देण्यात येतील. आवश्यकता असल्यास यासंदर्भात बैठक घेतली जाईल, असे सामंत यांनी सांगितले.