
मुंबई (Mumbai) : मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या 'एमयूटीपी ३ अ'मध्ये कल्याण ते बदलापूर तिसरी-चौथी मार्गिका प्रकल्पाचा समावेश आहे. प्रकल्पाअंतर्गत कल्याण ते बदलापूर रेल्वे स्टेशनदरम्यान तिसरी आणि चौथी मार्गिका बनविण्यात येणार आहे. नुकतेच वनविभागाने या दोन्ही मार्गिका उभारण्यासाठी रेल्वेला मंजुरी दिली आहे. त्यामुळे या प्रकल्पाच्या वाटेतील मोठा अडथळा दूर झाला आहे. तसेच या प्रकल्पात ४९ नवीन उड्डाणपुल बनविण्यात येणार असून यापैकी ४४ उड्डाणपुलांना मंजुरी मिळाली आहे. तर २५ उड्डाणपुलांचे काम सुरू करण्याला 'कमिश्नर ऑफ रेल्वे सेफ्टी'ने मंजुरी दिली आहे. या उड्डाणपुलांसाठी लवकरच टेंडर प्रसिद्ध केले जाणार आहे.
कल्याणच्या पुढे प्रवाशांची संख्या वाढल्याने या मार्गावरील ट्रेनमध्ये प्रवाशांची प्रचंड गर्दी होते. यामुळे या मार्गावरील प्रवाशांकडून ट्रेनची संख्या वाढविण्याची मागणी सातत्याने करण्यात येत होती. तर कल्याणच्या पुढे केवळ दोन मार्गिका आहेत. त्यामुळे प्रवाशांकडून आणखी दोन मार्गिका वाढविण्याची मागणी होती. या दोन्ही मार्गिकेवरून एकाच वेळी लोकल, मालगाडी, एक्सप्रेस देखील धावते. त्यामुळे लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा जास्तीचा वेळ जातो. या दोन मार्गिका झाल्यास प्रवाशांच्या वेळेची बचत होणार आहे.
मुंबई रेल्वे विकास महामंडळाद्वारे कल्याण ते बदलापूर दरम्यान तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेचे काम सुरू आहे. डिसेंबर २०२१ पासून या मार्गिकेवरील जमिनी संपादित करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या दोन मार्गिकेसाठी एकूण १३.६ हेक्टर जमिनीची गरज आहे. या मार्गिकेत एकूण दहा गावांची जमीन आहे. या जमिनीसाठी आतापर्यंत १३४.६४ कोटी रुपये देण्यात आले आहे.
या मार्गिकेचा ड्रोन मॅपिंगच्या माध्यमातून प्राथमिक सर्व्हे आणि इंजिनियरींग सर्व्हे करण्यात आला आहे. या प्रस्तावित मार्गिकेचे अलाइनमेंट देखील अंतिम झाले आहे. या मार्गिकेवरील विठ्ठलवाडी, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर या स्टेशनसाठी 'जनरल अरेंजमेंट ड्राँइग' (GAD) बनविण्यात आले आहे. अशाच प्रकारे 5 ROB ची डिझाईन देखील तयार आहे. यातील ४ डिझाईनला मध्य रेल्वेने मंजुरी दिली आहे.