मुंबई-नाशिक महामार्गावरील 'या' महत्त्वाच्या पुलाची दुरुस्ती कधी?
मुंबई (Mumbai) : मुंबई-नाशिक महामार्गावरील (Mumbai - Nashik Highway) वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या साकेत पुलाच्या (Saket Bridge) दुरुस्तीचे काम पावसाळ्यापूर्वी हाती घेऊन तडीस नेण्याचा निर्णय जिल्हाधिकारी कार्यालयात (Collector Office) आयोजित बैठकीत घेण्यात आला. या पुलाला पर्यायी पूल असलेल्या चिंचोटी ते माणकोली पुलाची दुरुस्ती होताच साकेत पुलाच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे.
उरण जेएनपीटीहून भिवंडी किंवा गुजरातच्या दिशेने जाण्यासाठी हजारो अवजड वाहने खारेगाव टोलनाक्या जवळ असलेल्या साकेत पूलामार्गे वाहतूक करत असतात. ठाणे, बोरिवलीहून नवी मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या नोकरदारवर्गाच्या वाहनांची वाहतूकही साकेत पुलावरून होत असते. हा मार्ग अत्यंत अरुंद असून तो जीर्ण झाला आहे. त्यामुळे अपघात टाळण्यासाठी राज्य रस्ते विकास महामंडळाने या जीर्ण पुलाच्या दुरुस्तीबाबतचा निर्णय तीन महिन्यांपूर्वी घेतला होता. हा मार्ग वाहतुकीसाठी महत्त्वाचा असल्याने साकेत पूल बंद झाल्यास मोठ्या वाहतूक कोंडीची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे वाहतूक शाखेने या कामास सुरुवातीला परवानगी नाकारली होती.
वाहतूक कोंडीमुळे स्थापन झालेल्या टास्क फोर्सची बैठक नुकतीच ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्यासह ठाणे वाहतूक शाखेचे अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग, राज्य रस्ते विकास महामंडळ आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे अधिकारी उपस्थित होते.
मागील वर्षी साकेत पुलावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले होते. तसेच हा पूल वाहतुकीस धोकादायक झाल्याने या मार्गाच्या दुरुस्तीचा मुद्दा या बैठकीत मांडण्यात आला. हा पूल बंद झाल्यास त्याला पर्यायी असा महत्त्वाचा मार्ग नसल्याची माहिती वाहतूक शाखेने दिली. तसेच पूल बंद झाल्यास त्याचा परिणाम ठाणे, कळवा, मुंब्रा आणि भिवंडी शहराला बसणार असल्याची माहिती वाहतूक पोलिसांनी दिली. तसेच एक शेवटचा पर्याय असलेला मानकोली ते चिंचोटी हा मार्ग उपलब्ध होऊ शकतो. त्याची अवस्था अत्यंत वाईट आहे. हा रस्ता दुरुस्त झाल्यास परवानगी देण्यात येईल अशी भूमिका वाहतूक शाखेने घेतली होती.
त्यानुसार आता मानकोली ते चिंचोटी या रस्त्याच्या डांबरीकरण आणि काँक्रिटीकरणाचे काम एका ठेकेदाराकडून सुरू करण्यात येत आहे. येत्या काही दिवसांत हे काम पूर्ण केले जाणार असल्याचा दावा सार्वजनिक बांधकाम विभागाकडून केला जात आहे. तसेच पावसाळ्यापूर्वी साकेत पुलाची दुरुस्ती करणे आवश्यक असल्याचे मत राज्य रस्ते विकास महामंडळाचे आहे. वाहतूक शाखेची परवानगी मिळताच साकेत पुलाची दुरुस्ती केली जाईल, असे राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.