
मुंबई (Mumbai) : ठाणे (Thane) महापालिकेच्या महत्वाकांक्षी नवीन ठाणे रेल्वे स्थानकाच्या कामाला गती आली आहे. ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या १४.८३ एकर जागेवर या उपनगरीय रेल्वे स्थानकाचे काम हाती घेण्यात आले आहे. नवीन स्थानकाकडे जाण्यासाठी ३ मार्गिका असून १ मार्गिका पूर्व द्रुतगती मार्गास जोडण्यात येणार आहे. या स्थानकाच्या कामासाठी ११९ कोटी रुपये तर जोडरस्ते आणि परिसर विकसित करण्यासाठी १४३ कोटी रुपये एकूण २६३ कोटी रुपये खर्च केला जाणार आहे. नवीन स्थानकाचा फायदा प्रामुख्याने वागळे इस्टेट, घोडबंदर रोड परिसरामधील नागरिकांना होणार आहे. तसेच भविष्यात वाढत्या लोकसंख्येसाठी सुद्धा हे स्थानक उपयुक्त ठरणार आहे.
ठाणे आणि मुलुंड रेल्वे स्थानकावर प्रवाशांचा भार वाढला आहे. हा भार कमी करण्यासाठी दोन्ही स्थानकांच्या मधोमध म्हणजेच मनोरुग्णालयाच्या जागेत नवीन ठाणे रेल्वे स्थानक उभारण्यात येत आहे. यातील रेल्वे परिचलन क्षेत्रामधील ट्रॅक बांधणे, रेल्वे स्थानक इमारत बांधणे, अशी अनुषंगिक कामे रेल्वेकडून तर परिचलन क्षेत्राच्या बाहेरील डेक, रॅम्प अशी अनुषंगिक कामे स्मार्ट सिटीच्यावतीने करण्यात येत आहेत. या कामाची पाहणी महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी नुकतीच केली. या पाहणी दरम्यान या प्रकल्पाशी निगडित वेगवेगळ्या विषयांची आयुक्त राव यांनी माहिती घेतली. त्यावेळी मध्य रेल्वेच्या मार्गावरून जाणाऱ्या उच्च दाब वीज वाहिनीमुळे काम थांबवू शकते, अशी बाब त्यांच्या निदर्शनास आली. यामुळे नवीन रेल्वे स्थानकांच्या शेजारील उच्च दाब वीज वाहिनीबाबत महावितरणच्या अधिकाऱ्यांना १५ डिसेंबरपर्यंत तात्परुती उपाययोजना करावी आणि महिनाभरात पर्यायी उपाययोजना करावी, असे निर्देश आयुक्त राव यांनी दिले. तसेच, या वाहिनीचा मनोरा हटवून ही वाहिनी भूमिगत करण्याबाबत रेल्वे, महापालिका आणि महावितरण यांनी एकत्रित मार्ग काढावा, असेही आयुक्तांनी सांगितले. नवीन उपनगरीय रेल्वे स्थानकाच्या कामामुळे बाधित होणाऱ्या झोपडीधारकांचे पुनर्वसन करण्याबाबतही तत्काळ कार्यवाही करण्याचे निर्देशही त्यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दिले. या पाहणीदरम्यान, आयुक्त राव यांनी आतापर्यंत झालेले काम, पोहोच मार्गाचे काम, पूल या कामांचा आढावा घेतला.
ठाणे महापालिकेच्या ठाणे-मुलुंड स्थानकादरम्यान प्रस्तावित नवीन उपनगरीय रेल्वे स्थानक या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयाची १४.८३ एकर जागा उपलब्ध होण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाचे आदेशानुसार ५ महिला रुग्ण कक्षासाठी महापालिकेने नवीन वास्तू बांधून दिलेली असून त्याचा वापर सुरू झाला आहे. रुग्ण कक्ष स्थलांतरीत झाल्यामुळे नवीन उपनगरीय रेल्वे स्थानकाचे काम ऑक्टोबर २०२३ पासून सुरु झाले आहे. नवीन स्थानकाकडे जाण्यासाठी ३ मार्गिका असून १ मार्गिका पूर्व द्रुतगती मार्गास जोडण्यात येणार आहे. या स्थानकाच्या कामासाठी एकूण ११९ कोटी ३२ लाख रुपये तर, जोडरस्ते आणि परिसर विकसित करण्यासाठी १४३ कोटी ७० लाख असा एकूण २६३ कोटी २ लाख इतका खर्च येणार आहे. हे काम ठाणे स्मार्ट सिटी लिमिटेड अंतर्गत करण्यात येत आहे. या पाहणीवेळी अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, प्रशांत रोडे, उप नगर अभियंता सुधीर गायकवाड, कार्यकारी अभियंता धनाजी मोदे, महावितरणचे अधिकारी आदी उपस्थित होते.