
मुंबई (Mumbai) : मुंबई महापालिकेच्या मुदत ठेवी झपाट्याने खाली येत आहेत. पैसा तर कमी होतोय पण शहरात नेमकी काय नवीन उभं राहतेय हा प्रश्न आहे. मुंबईत रस्त्यांवर प्रचंड खड्डे आहेत, वाहतूक कोंडी होते, पाणी साचते, पिण्याच्या पाण्याची समस्या आहेच. मग हजारो कोटी रुपये जातात कुठे? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील (Jayant Patil) यांनी उपस्थित केला.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या २६ व्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईतील घाटकोपर येथे संकल्प शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित करत होते. जयंतराव पाटील आपल्या भाषणात म्हणाले की, इतिहासाचे दाखले पाहता घाटकोपर हे चळवळींचे शहर आहे, असे प्रकर्षाने जाणवते. अण्णाभाऊ साठे नजीकच्या परिसरात राहायचे आणि त्या वास्तव्यात त्यांनी फकिरा ही कादंबरी लिहिली. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत त्यांनी लिहिलेले साहित्य युवकांसाठी प्रेरणादायी ठरले असे त्यांनी सांगितले.
मुंबई आपल्याला सहजासहजी मिळालेली नाही. आज मुंबईला कमकुवत करण्याचा प्रयत्न होत आहे असा आरोप त्यांनी केला. मध्यंतरी एक बातमी आली की पेटंट कार्यालयाचं मुख्यालय मुंबईतून थेट दिल्लीला हलवलं जातंय. आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र म्हणजेच आयएफएससी IFSC ची कल्पना केंद्रात कॉंग्रेसप्रणित 'यूपीए' सरकार असताना मांडली गेली होती. त्यासाठी बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येथे भूखंड राखून ठेवला होता. मात्र हे केंद्र देखील रातोरात हलवलं. २६/११ चा हल्ला झाल्यानंतर मुंबईच्या सुरक्षेच्या दृष्टीने नॅशनल मरीन पोलिस अकॅडेमी आणि नॅशनल सिक्युरिटी गार्ड्स केंद्र स्थापन करण्याचे ठरवले मात्र आता ते गुजरात मध्ये नेले. मुंबईचा हिरेबाजार गुजरातला नेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अनेक प्रकारे मुंबईची आर्थिक कोंडी करण्याचा प्रयत्न केला जात आहे असंही ते म्हणाले.
मुंबई महापालिकेच्या मुदत ठेवी झपाट्याने खाली येत आहेत. पैसे तर कमी होतोय पण शहरात नेमकी काय नवीन उभं राहतेय हा प्रश्न आहे. मुंबईत रस्त्यांवर प्रचंड खड्डे आहेत, वाहतूक कोंडी होते, पाणी साचते, पिण्याच्या पाण्याची समस्या आहेच. मग हजारो कोटी रुपये जातात कुठे? विविध अपघातात सर्वसामान्य मुंबईकरांचा नाहक जीव जातोय. त्याची जबाबदारी घेतली जात नाही अशी खंत त्यांनी बोलवून दाखवली. पक्षाची विभागणी झाली. मात्र मुंबईच्या कार्यकर्त्यांनी पवार साहेबांची साथ सोडली नाही. लोकांची सहानभूती आणि विश्वास ही पक्षाची खरी ताकद आहे असे म्हणत त्यांनी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरला तसेच महानगरपालिकेची निवडणूक येऊ घातली आहे. पारदर्शीपणे आणि निष्ठेने कार्य करणाऱ्या कार्यकर्त्याच्या मागे लोकं नक्कीच उभे राहतात. त्यामुळे आपल्या वॉर्डमध्ये कसून तयारीला लागा असे आदेशही त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिले.