

मुंबई (Mumbai): राज्य सरकारने उत्तन ते विरार या सागरी सेतूच्या उभारणीला आणि पुढे वाढवण बंदरापर्यंतच्या त्याच्या विस्ताराला मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे दक्षिण मुंबईपासून ते थेट पालघर जिल्ह्यातील होऊ घातलेल्या देशातील सर्वात मोठ्या वाढवण बंदरापर्यंत सुमारे १२० किलोमीटर लांबीचा एक अखंड सागरी महामार्ग उभा राहणार आहे.
हा प्रस्ताव आता शिफारशीसाठी केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थात एमएमआरडीएमार्फत हा प्रकल्प राबविला जाणार आहे. अथांग पसरलेला अरबी समुद्र आणि त्याच्या सोबतीने धावणारी मुंबईकरांची स्वप्ने, हे समीकरण आता एका वेगळ्या उंचीवर पोहोचणार आहे. मुंबई महानगर, जी आपल्या अचाट वेगासाठी ओळखली जाते, ती आता एका अभूतपूर्व प्रवासाच्या क्रांतीला सामोरे जात आहे.
मुंबईच्या किनारपट्टीला स्पर्श करत, निळशार लाटांच्या सोबतीने आकारास येणारा हा प्रकल्प या महानगराच्या विकासाची नवी जीवनवाहिनी ठरणार आहे. मुंबईच्या धकाधकीच्या जीवनाला सुखकर करणारा आणि प्रगतीची कवाडे उघडणारा हा प्रकल्प महत्त्वाकांक्षी ठरणार आहे.
राज्य सरकारने उत्तन ते विरार या सागरी सेतूच्या उभारणीला आणि पुढे वाढवण बंदरापर्यंतच्या त्याच्या विस्ताराला मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे दक्षिण मुंबईपासून ते थेट पालघर जिल्ह्यातील हो घातलेल्या देशातील सर्वात मोठ्या वाढवण बंदरापर्यंत सुमारे १२० किलोमीटर लांबीचा एक अखंड सागरी महामार्ग उभा राहणार आहे.
हा महामार्ग पूर्णतः प्रवेश-नियंत्रित आणि अतिवेगवान असणार असून, तो मुंबईला तिच्या उत्तरेकडील दूरवरच्या उपनगरांशी अधिक घट्टपणे जोडणार आहे. या प्रकल्पामुळे लोक, उद्योग आणि मालवाहतूक यांचे एक सक्षम आणि आधुनिक जाळे निर्माण होणार आहे.
या महाकाय प्रकल्पाचा मुकुटमणी ठरणार आहे तो म्हणजे २४.३५ किलोमीटर लांबीचा उत्तन ते विरार हा सागरी सेतू. हा सेतू देशातील सर्वात लांब सागरी पूल म्हणून ओळखला जाईल, जो समुद्राच्या छातीवर उभा राहून मानवी इंजिनिअरिंगचा एक उत्कृष्ट नमुना सादर करेल.
सहा पदरी रस्ता, आपत्कालीन मार्गिका, जहाजांच्या वाहतुकीसाठी विशेष रचना आणि अत्याधुनिक वाहतूक नियंत्रण प्रणालीने सज्ज असलेला हा प्रकल्प वेग आणि सुरक्षिततेचा नवा मापदंड प्रस्थापित करेल. याला जोडणारे ३० किलोमीटरहून अधिक लांबीचे इतर रस्ते प्रवाशांना मुख्य प्रवाहाशी सहजतेने जोडून घेतील.
जेव्हा हा मुंबई-वाढवण द्रुतगती मार्ग पूर्णत्वास येईल, तेव्हा मुंबईकरांचे दैनंदिन आयुष्य आमूलाग्र बदलून जाईल. वर्षानुवर्षे पश्चिम द्रुतगती महामार्ग, एसव्ही रोड आणि लिंक रोडवर होणारी वाहतुकीची कोंडी आणि त्यामुळे होणारी घालमेल इतिहासजमा होईल. प्रवासाचा वेळ वाचल्यामुळे नागरिकांच्या आयुष्यात निवांतपणा येईल, तर इंधनाची बचत होऊन प्रदूषणातही मोठी घट होईल.
हा प्रकल्प केवळ प्रवासापुरता मर्यादित न राहता, तो पर्यटनाला चालना देणारा आणि गृहनिर्माण क्षेत्राला नवी उभारी देणारा ठरेल. उत्तन, भाईंदर, वसई आणि विरार या पट्ट्यातील विकासाला नवे पंख फुटतील आणि स्थानिकांसाठी रोजगाराच्या हजारो नवीन संधी निर्माण होतील.