

मुंबई (Mumbai): अंधेरी येथील अद्ययावत सेव्हन हिल्स हॉस्पिटल मुंबई महानगरपालिकेने ताब्यात घ्यावे ही मुंबईकरांची मागणी आहे. हे हॉस्पिटल उद्योगपती मुकेश अंबानी यांना देण्याचा घाट घातला जात आहे. मात्र कोणत्याही परिस्थितीत या हॉस्पिटलचे खाजगीकरण करू नये, भाजप महायुती सरकारने मुंबईकरांच्या मागणीची तत्काळ दखल घ्यावी, यासाठी ६ नोव्हेंबरला सकाळी ११ वाजता हॉस्पिटलसमोर तीव्र आंदोलन करणार, असा इशारा अंधेरी विकास समितीने दिला आहे.
यासंदर्भात माहिती देताना मुंबईचे माजी उपमहापौर तथा काँग्रेसचे उपाध्यक्ष राजेश शर्मा म्हणाले की, अंधेरी येथील सेव्हन हिल्स हॉस्पिटल मुंबई महानगरपालिकेने ताब्यात घ्यावे यासाठी मागील काही महिन्यापासून प्रयत्न केला जात आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, बीएमसी व संबंधित यंत्रणांकडे यासंदर्भात सातत्याने पाठपुरावा केला आहे. मुख्यमंत्री वा कोणत्याही यंत्रणांकडून त्याला प्रतिसाद दिला जात नाही हे गंभीर आहे. भाजप महायुती सरकारला मुंबईकांच्या आरोग्याची चिंता नाही त्यांना फक्त उद्योगपतींचे हित पहायचे आहे.
मुंबई महानगरपालिका आणि राज्य सरकारने सार्वजनिक गरजा लक्षात घेऊन सेव्हन हिल्स हॉस्पिटलच्या जागेत प्रगत वैद्यकीय संशोधन केंद्र आणि शिक्षणासह आंतरराष्ट्रीय दर्जाचे हॉस्पिटल म्हणून विकसित करण्याचा विचार करणे आवश्यक आहे. सेव्हन हिल्स हॉस्पिटलच्या आवारात शिल्लक असलेल्या जागेवर मेडीकल व नर्सिंग कॉलेज सुरू करता येऊ शकते, असे शर्मा म्हणाले.