
मुंबई (Mumbai) : पायाभूत सुविधांचे विकास प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर त्या जवळील शासकीय जमिनी चिन्हांकित करण्यात याव्यात. या शासकीय जमिनींचा वांद्रे कुर्ला संकुलाच्या (BKC) धर्तीवर विकास करून नवीन आर्थिक केंद्र विकसित करावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) सह्याद्री अतिथीगृह येथे सागरी किनारा रस्ता उत्तर वाहिनी कामांच्या आढावा बैठकीत दिले. (Preparations for the second BKC have begun)
मढ-वर्सोवा जोड मार्गाचे नियोजन करा
कांदळवनांचे संवर्धन करीत वर्सोवा ते भाईंदर सागरी किनारा उत्तर वाहिनी रस्त्याचे काम पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. सागरी किनारा रस्त्यांच्या कामांमुळे बाधित होणाऱ्या कांदळवनापेक्षा अधिकचे कांदळवन वाढविण्यात यावे. प्रकल्पासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व परवानग्या एकाच वेळी घेण्यात याव्यात. प्रकल्प निश्चित केलेल्या डिसेंबर २०२८ कालावधी पर्यंत पूर्ण करावा, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
फडणवीस म्हणाले, या रस्ता कामासाठी १६५ हेक्टर जमिनीची आवश्यकता आहे. यामध्ये बहुतांशी शासकीय जमिन आहे. प्रकल्पाकरिता शासकीय जमीन हस्तांतरित करण्याची कार्यवाही यंत्रणांनी पुढील १५ दिवसांत पूर्ण करावी. वर्सोवा येथील मत्स्य व्यवसाय विभागाची प्रकल्पासाठी आवश्यक असणारी जागाही पाठपुरावा करून प्राप्त करून घ्यावी. या सागरी किनारी मार्गाला मढ ते वर्सोवा जोड मार्ग एम.एम.आर.डी.ए सोबत समन्वय ठेवून तयार करावा.
'या' गोष्टींचे नियोजन करा
हा सागरी किनारी रस्ता निर्माण करतानाच यावर जाहिरातींसाठी फ्लेक्स, होर्डिंगच्या संबंधाने नियोजन करावे, यासाठी सल्लागाराची नियुक्ती करावी. जाहिरातींच्या माध्यमातून मिळणाऱ्या उत्पन्नातून रस्त्यांच्या दुरुस्ती आणि व्यवस्थापनावरील खर्चासाठी तरतूद करता येईल, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केल्या. बैठकीस बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी, अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर, ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, मुंबई उपनगर जिल्हाधिकारी सौरभ कटियार, मिरा भाईंदर मनपा आयुक्त श्री. शर्मा, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अनिल गायकवाड आदी उपस्थित होते.
वर्सोवा ते भाईंदर सागरी किनारी मार्ग
या सागरी किनारी मार्गाचा मुख्य रस्ता २६ किलोमीटर लांबीचा आहे. या रस्त्याची जोडमार्गांसह एकूण लांबी ६३ किलोमीटर आहे. सागरी किनारी प्रकल्पाचे काम सहा टप्प्यात करण्यात येणार आहे. यासाठी टेंडर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. प्रकल्पासाठी एकूण १६५ हेक्टर जमीन लागणार आहे.