
मुंबई (Mumbai) : भारतीय रेल्वेकडून नवीन प्रवासी भाडेवाढीचा प्रस्ताव रेल्वे मंत्रालयाला देण्यात आला आहे. या प्रस्तावाला मंत्रालयाकडून मंजुरी मिळाली तर येत्या १ जुलैपासून रेल्वेच्या तिकीट दरात वाढ होऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली.
काय आहे प्रस्ताव?
वातानुकूलित, बिगर-वातानुकूलित एक्स्प्रेस/मेल गाड्यांसह दुय्यम श्रेणीतील गाड्यांच्या तिकिटाच्या दरात वाढ होऊ शकते. दरम्यान ५०० किलोमीटर अंतराच्या पुढचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी भाडेवाढ लागू करण्याचा प्रस्ताव आहे. यामुळे ५०० किलोमीटरच्या आतील प्रवास असणाऱ्यांना भाडेवाढीचा फटका बसणार नाही. वातानुकूलित डब्यांसाठी प्रतिकिलोमीटर मागे २ पैशांची तर बिगर वातानुकूलित डब्यांसाठी प्रतिकिलोमीटर मागे एका पैशाची भाडेवाढ करण्याचा प्रस्ताव आहे.
मासिक सीझन पास दरात वाढ नाही
दुय्यम श्रेणीच्या डब्यातून प्रवास करणाऱ्यांना प्रतिकिलोमीटर मागे ५० पैसे अतिरिक्त मोजावे लागतील. प्रस्तावित तिकीट दरवाढ केवळ मेल आणि एक्स्प्रेस गाड्यांसाठी लागू केली जाऊ शकते. उपनगरी रेल्वे प्रवासाच्या तिकीट दरात तसेच मासिक सीझन पास दरात वाढ करण्याचा कोणतीही प्रस्ताव नाही. दैनंदिन प्रवास करणाऱ्या लाखो लोकांना यामुळे दिलासा मिळणार आहे.
चार्ट आधीच जारी होणार
दरम्यान तिकीट बुकिंग नियमात बदल करण्याचा प्रस्ताव असल्याचे रेल्वेकडून काही दिवसांपूर्वी सांगण्यात आले होते. सध्याच्या नियमावलीनुसार गाडी सुटण्याच्या चार तासांपूर्वी तिकीट कन्फर्म आहे की नाही ते समजते. मात्र आगामी काळात गाडी सुटायच्या २४ तास आधी चार्ट जारी करण्याचा रेल्वेचा विचार आहे. राजस्थानमधील बिकानेर विभागात यादृष्टीने पायलट प्रकल्प राबविला जात आहे. हा प्रकल्प यशस्वी झाला तर अन्य विभागात देखील हीच पद्धत अवलंबिली जाणार आहे.