

मुंबई (Mumbai): मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थात एमएमआरडीएमार्फत उभारल्या जात असलेल्या मुंबई मेट्रो लाईन - १२ (कल्याण ते तळोजा) या प्रकल्पाने आणखी एक मोठी कामगिरी साध्य केली आहे.
शिळफाटा रोडवरील डोंबिवली एमआयडीसी मेट्रो स्टेशनजवळ १०० वा यू-गर्डर यशस्वीरीत्या लाँच करण्यात आला असून प्रकल्पाच्या बांधकामात हा अत्यंत महत्वाचा टप्पा आहे. यामुळे प्रकल्पाला आणखी वेग मिळणार आहे.
सुमारे २३.५७ किमी लांबीचा हा उन्नत मार्ग १९ मेट्रो स्थानकांद्वारे कल्याण, डोंबिवली, तळोजा आणि पुढे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला हरित, अखंड आणि जलद पद्धतीनं जोडणार आहे.
या माध्यमातून ठाणे ते नवी मुंबई दरम्यान अधिक स्वच्छ, सुलभ आणि पर्यावरणपूरक गतिशीलतेचा मार्ग मोकळा होणार आहे. तसेच कळवा ते तळोजा परिसरातील ट्रान्झिट–ओरिएंटेड विकासालाही चालना मिळणार आहे.
कळवा-शिळफाटा-तळोजा मार्गाला समांतर धावणारा हा कॉरिडॉर तब्बल ७ किमी एमएसआरडीसी फ्लायओव्हरच्या एकत्रित रचनेसह उभा राहत आहे. यात कोळेगावजवळील १०० मीटर मोकळा स्पॅन, महत्त्वाच्या रेल्वे आणि आरओबी क्रॉसिंग्ज तसेच २१ - २३ मीटर उंचीवरील उन्नत स्थानकं अशा अभियांत्रिकी कौशल्याच्या अनेक विशेष स्पॅनचा या प्रकल्पात समावेश असेल.
दरम्यान, या प्रकल्पाच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण इंटरचेंज सुविधांद्वारे प्रवासी खालील मार्गांशी सहज जोडले जातील. कळवा येथे मेट्रो लाईन ५, हेडूतने येथे मेट्रो लाईन १४, अमनदूत येथे नवी मुंबई मेट्रो लाईन १ तसेच कळवा जंक्शनला सेंट्रल रेल्वेशी थेट एफओबी द्वारे जोडलं जाणार आहे. हा प्रकल्प मे २०२८ पर्यंत पूर्ण करण्याचं लक्ष्य आहे.
आतापर्यंतची प्रगती...
कल्याण - मानपाडा सर्व्हे व अलाइनमेंट पूर्ण.
पहिला पाईल, पियर कॅप आणि यू - गर्डर यशस्वीरीत्या कास्ट आणि उभारणी.
पूर्ण क्षमतेसाठी बॅचींग प्लांट सुरू.
प्रमुख भागांवर नागरी कामं आणि पियर बांधकाम वेगानं सुरू.
पत्रीपूल व अमनदूत परिसरात भूमी संपादन व पुनर्वसनाची प्रक्रिया सुरू
विशेष स्पॅन...
५४ मी - एपीएमसी कल्याण मार्केट.
५६ मी - रीजेन्सी अनंतम चौक.
६५ मी (२ स्पॅन) - सेंट्रल रेल्वे आरओबी, पत्रीपूल.
७५ मी - तळोजा आरओबी (स्टील स्ट्रक्चर).
१०० मी - विरार ते अलिबाग मल्टीमोडल कॉरिडॉर, कोळेगाव.