

मुंबई (Mumbai): कल्याण डोंबिवली ते नवी मुंबई या मार्गावर प्रवास करणाऱ्यांची आता वाहतूक कोंडी तसेच लोकलच्या गर्दीतून सुटका होणार आहे. मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी महत्त्वाचा दुवा ठरणाऱ्या ऐरोली-कटाई उन्नत मार्गामुळे हा प्रवास फक्त 15 मिनिटांत पूर्ण होणार आहे.
ऐरोली-कटाई उन्नत मार्गाच्या दोन्ही टप्प्यातील 80 टक्के कामे पूर्ण झाले आहे. वर्षाअखेरीपर्यंत हा नवा फ्री-वे वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता आहे.
कल्याण, डोंबिवलीतून नवी मुंबईत जाण्यासाठी सध्या रेल्वे हा जलद पर्याय आहे. रस्ते मार्गे गेल्यास हा प्रवास जवळपास दीड तासांचा आहे. त्यातही प्रवासी वाहतूक कोंडीत अडकतात. कल्याण, डोंबिवलीतून नवी मुंबईत जाण्यासाठी ठाणे मार्गे ट्रान्स हार्बर लोकल सेवा उपलब्ध आहे. मात्र या मार्गावर दिवसेंदिवस प्रवाशांची गर्दी वाढत आहे.
त्या पार्श्वभूमीवर ऐरोली ते मुंब्रा प्रकल्पाचा विस्तार म्हणून मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, एमएमआरडीएने मुंब्रा-कटाई नाका हा उन्नत मार्ग उभारण्याचा निर्णय घेतला. देसाई खाडीवरून हा मार्ग जाणार आहे. तसेच थेट कनेक्टीव्हिटीसाठी पारसिक डोंगरातून भुयारी मार्ग काढण्यात आला आहे.
2018 मध्ये ऐरोली-कटाई उन्नत मार्गाचे भूमिपूजन करण्यात आले होते. पहिल्या टप्प्यात ठाणे-बेलापूर मार्ग ते राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 हा 3.43 किमीचा मार्ग उभारला जात आहे. दुसरा टप्पा ऐरोली पुलापासून ठाणे-बेलापूर मार्गावरील भारत बिजलीपर्यंत जोड रस्ता असा असणार आहे.
या मार्गामुळं ठाणे-नवी मुंबई, बदलापूर, कल्याण डोंबिवली या परिसरात होणारी वाहतूक कोंडी फुटणार आहे. थेट मुंब्र्यावरुन नवी मुंबईला पोहोचता येणार आहे.
दरम्यान, 6.71 किमीचा हा मार्ग देसाई खाडी देखील पार करणार आहे. ऐरोली ते डोंबिवलीजवळील कटाई नाक्यापर्यंतचा प्रवास अवघ्या 15 मिनिटांत पूर्ण करण्यासाठी पारसिक डोंगराखालून भुयारी मार्ग काढण्यात आला आहे. या प्रकल्पात असलेला बोगदा हा चार मार्गिकेचा असणार आहे. या मार्गामुळं ऐरोली ते कटाई नाका हा दीड तासांचा प्रवास 15 मिनिटांवर येणार आहे.
हा मार्ग खुला झाल्यानंतर ऐरोली येथील जड वाहनांची वाहतूक कमी होईल. मुंबईवरून ही वाहने थेट कल्याणकडे या उन्नत मार्गावरून पुढे जातील त्याचप्रमाणे कल्याणकडून येणारी वाहने थेट मुंबईत पुढे मार्गस्थ होतील.