

मुंबई (Mumbai): मुंबईला जागतिक दर्जाचे पर्यटन केंद्र म्हणून विकसित करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल टाकण्यात येत असून, मुंबई बंदर प्राधिकरणाच्या माध्यमातून प्रिन्सेस डॉक येथे १२ हेक्टर क्षेत्रावर अत्याधुनिक मरिना प्रकल्प उभारण्यात येणार आहे.
या प्रकल्पाच्या बांधकाम, संचालन व देखभालीसाठी मागविण्यात आलेल्या टेंडरसाठी पाच दिग्गज कंपन्यांनी प्रतिसाद दिला आहे. सेम इंडिया प्रोजेक्ट्स लिमिटेड, एल.अँड टी., आरकेईसी प्रोजेक्ट्स, एसीसी इन्फ्रास्ट्रक्चर आणि विश्वसमुद्र इंजिनीअरिंग प्रायव्हेट लिमिटेड या पाच कंपन्यांचा यात समावेश आहे.
सार्वजनिक-खासगी सहभाग तत्त्वावर राबविण्यात येणाऱ्या या प्रकल्पासाठी सुमारे ८८७ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. मरिना प्रकल्पात ३० मीटर लांबीपर्यंतच्या ४२४ लहान व मोठ्या नौका (यॉट्स) उभ्या करण्याची सुविधा उपलब्ध असणार आहे. यासाठी किनारपट्टीपासून सुमारे ५२३ मीटर आत समुद्रात विशेष जागा विकसित केली जाणार आहे.
या प्रकल्पांतर्गत मुख्य मरिना टर्मिनल इमारत उभारण्यात येणार असून 'नमो भारत इंटरनॅशनल सेलिंग स्कूल', सागरी पर्यटन विकास केंद्र, हॉटेल्स, क्लबहाऊस तसेच नौका दुरुस्ती व देखभाल सुविधा विकसित केल्या जाणार आहेत. याशिवाय बँक, एटीएम, वाहनतळ, टॅक्सी स्टँड, सभागृह, हॉल आणि सुपरमार्केट यांसारख्या नागरी सुविधांचाही समावेश असणार आहे.
मुंबई बंदर प्राधिकरणाकडून सध्या तांत्रिक निविदांची छाननी सुरू असून, त्यानंतर आर्थिक निविदा खुल्या करण्यात येणार आहेत. सेम इंडिया प्रोजेक्ट्स लिमिटेड, एल.अँड टी., आरकेईसी प्रोजेक्ट्स, एसीसी इन्फ्रास्ट्रक्चर आणि विश्वसमुद्र इंजिनीअरिंग प्रायव्हेट लिमिटेड या पाच कंपन्यांनी निविदा सादर केल्या आहेत. मुंबईच्या पर्यटन आणि सागरी विकासाच्या दृष्टीने हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.