
मुंबई (Mumbai) : भिवंडी येथील माता आणि बालक रुग्णालयाच्या (Hospital) बांधकामातील विलंब आणि गैरप्रकाराप्रकरणी (Scam) स्थानिक आमदार रईस शेख (Rais Shekh) वरिष्ठ अधिकाऱ्यांसह प्रत्यक्ष भेट देतील आणि त्यांच्या अहवालावर आवश्यक ती कारवाई केली जाईल. रुग्णालय लवकरात लवकर सुरू व्हावे यासाठी उपकरणे आणि मनुष्यबळाचे काम हाती घेण्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर (Prakash Abitkar) यांनी जाहीर केले.
समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी विधानसभेत तारांकित प्रश्नाद्वारे उपस्थित केलेल्या मुद्द्याला उत्तर देताना आबिटकर यांनी ही माहिती दिली. भिवंडी शहर आणि ग्रामीण भागात १८ लाख लोकसंख्या आहे, तरीही फक्त एकच आयजीएम रुग्णालय आहे. हे रुग्णालय परिसरातील फक्त २७% महिलांना सेवा देऊ शकते, तर उर्वरित ७३ % महिलांना उपचारांसाठी मुंबई आणि इतर ठिकाणी जावे लागते, असे आमदार रईस शेख म्हणाले.
माता आणि बालक रुग्णालयाच्या बांधकामातील विलंब आणि गैरप्रकार उघडकीस आणताना आमदार रईस शेख म्हणाले की प्रकल्पाची मुदत ४०० दिवसांची आहे. आज कामाचा आदेश देऊन ३७६ दिवस उलटले आहेत, परंतु फक्त ३६% काम पूर्ण झाले आहे. उर्वरित ७४% काम फक्त २४ दिवसांत पूर्ण करणे सरकारसाठी शक्य आहे का? मोठ्या प्रमाणात विलंब होऊनही जबाबदार अधिकाऱ्यांवर किंवा कंत्राटदारांवर कोणतीही कारवाई केलेली नाही, असे आमदार रईस शेख म्हणाले.
कामाच्या विलंबासाठी आणि निकृष्ट दर्जासाठी जबाबदार असलेल्यांवर सरकार कारवाई करेल का? हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आणखी किती दिवस लागतील? रुग्णालयासाठी आवश्यक असलेली उपकरणे आणि मनुष्यबळाचे काय? रुग्णालय लवकर सुरू व्हावे यासाठी समांतर प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणी आमदार रईस शेख यांनी केली.
शेख यांनी उपस्थित केलेल्या विविध मुद्द्यांना उत्तर देताना, आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सूचवले की आमदार रईस शेख यांनी उपसंचालक आणि अधीक्षक अभियंत्यासह एका महिन्यात प्रत्यक्ष भेट द्यावी. या भेटीचा अहवाल तयार केला जाईल.
त्या अहवालामध्ये आपण नमूद केल्याप्रमाणे गैरप्रकारांवर कारवाई केली जाईल तसेच रुग्णालय लवकर सुरू करण्यासाठी आपल्या सूचनांवर कार्यवाही केली जाईल. माता आणि बालक रुग्णालयाचे काम नोव्हेंबरपर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. आम्ही आवश्यक उपकरणे आणि मनुष्यबळ यासाठी आवश्यक आदेश लवकर देऊ, असे आबिटकर म्हणाले.