

मुंबई (Mumbai): मुंबईतील सफाई कामगारांना हक्काचे घर मिळावे, यासाठी आश्रय योजनेचा दुसरा टप्पा राबवण्यात येणार आहे.
चेंबूर येथील पी. एल. लोखंडे मार्गावर मुंबई महापालिकेच्या सफाई कामगारांच्या घरांचा पुनर्विकास प्रकल्प आता मार्गी लागणार आहे. एकूण ३०० चौरस फूट क्षेत्रफळाच्या ५८० सदनिका उभारण्यात येणार आहेत. प्रीफॅब्रिकेशन तंत्रज्ञानाचा वापर करून जलद व दर्जेदार बांधकाम करण्याच्या उद्देशाने टर्नकी पद्धतीने कंत्राटदार नियुक्त करण्यात येणार आहे. महापालिकेने या कामासाठी टेंडर प्रसिद्ध केले आहे.
मुंबई महापालिकेत सध्या सुमारे २८ हजार सफाई कामगार कार्यरत आहेत. या कामगारांसाठी पालिका वसाहतींमध्ये फक्त सहा हजार सेवा सदनिका आहेत. सेवेत असलेले बहुतांशी सफाई कामगार हे झोपडपट्टीत राहत असून त्यांना मालकी हक्काची घरे देण्याची मागणी केली जात होती. त्यांच्यासाठी नेमलेल्या आयोगांकडूनही घरांची शिफारस करण्यात आली होती. ती राज्य सरकार व महापालिकेकडून मान्य करण्यात आली आहे.
मुंबई महापालिकेच्या आश्रय योजनेंतर्गत चेंबूर परिसरात सफाई कर्मचाऱ्यांसाठी उभारण्यात येणाऱ्या गृहनिर्माण प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी ई-टेंडर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. प्रीफॅब्रिकेशन तंत्रज्ञानाचा वापर करून जलद व दर्जेदार बांधकाम करण्याच्या उद्देशाने टर्नकी पद्धतीने कंत्राटदार नियुक्ती करण्यात येणार आहे.
टेंडर प्रसिद्ध व विक्रीची प्रक्रिया २८ जानेवारी २०२६ रोजी दुपारी ११ वाजल्यापासून सुरू झाली आहे. टेंडर सादर करण्याची अंतिम मुदत २४ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत असून लिफाफा 'ए', 'बी' आणि 'सी' (ऑनलाइन) स्वरूपात सादर करणे आवश्यक असल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे.
या टेंडरसाठी ३५ हजार ६९५ रुपये इतके टेंडर शुल्क निश्चित करण्यात आले असून त्यात ३० हजार २५० रुपये मूळ शुल्कासह ९ टक्के एसजीएसटी व ९ टक्के सीजीएसटी समाविष्ट आहे तसेच टेंडर सुरक्षा ठेव (ईएमडी) म्हणून १ कोटी ३५ लाख रुपये इतकी रक्कम निश्चित करण्यात आली आहे. प्रकल्पाचा कालावधी १८० दिवसांचा असून टेंडर वैधता कालावधीही त्यानुसार ठेवण्यात आला आहे.