

मुंबई (Mumbai): मुंबईच्या उत्तरेकडील वाहतूक व्यवस्था अधिक गतिमान करण्यासाठी भाईंदर ते विरारदरम्यान सुमारे ३० किलोमीटर लांबीच्या सागरी सेतूची (सी-लिंक) उभारणी करण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी सुमारे ५५ हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून डिसेंबर २०२६ अखेरपर्यंत टेंडर प्रसिद्ध करण्याचे एमएमआरडीएचे नियोजन आहे.
मुंबईतील वांद्रे-वर्सोवा सागरी सेतूला पुढे वर्सोवा-भाईंदर किनारी मार्गाद्वारे जोडणी दिली जाणार आहे. या प्रकल्पाची अंमलबजावणी मुंबई महानगरपालिकेकडून केली जात आहे. त्यानंतर भाईंदरपासून विरारपर्यंतचा प्रवास सुलभ करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) उत्तन-विरार सागरी सेतू उभारण्यात येणार आहे.
या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामध्ये २४.३५ किलोमीटर लांबीचा मुख्य सागरी सेतू तसेच ३०.७७ किलोमीटर लांबीचे तीन अंतरबदल मार्ग (इंटरचेंज) असतील. यामध्ये उत्तन इंटरचेंज ९.३२ किलोमीटर, वसई इंटरचेंज २.५ किलोमीटर आणि विरार इंटरचेंज १८.९५ किलोमीटर लांबीचा असणार आहे. या प्रकल्पासाठी सुमारे ५५ हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
पर्यावरणीय मान्यतेसाठी केंद्र सरकारकडे पाठविण्यात आलेल्या प्रस्तावास १८ मार्च रोजी मंजुरी मिळाली आहे. मात्र, प्रकल्पाच्या पुढील प्रक्रियेसाठी वन विभागाच्या ‘ना हरकत प्रमाणपत्रा’ची प्रतीक्षा असल्याची माहिती एमएमआरडीएतील सूत्रांनी दिली. हे प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर प्रकल्पासाठी टेंडर प्रक्रिया सुरू केली जाणार आहे.
या सागरी सेतूमुळे मुंबई महानगर प्रदेशातील वाहतूक कोंडी कमी होऊन नागरिकांचा प्रवास अधिक वेगवान व सुखकर होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
सध्या देशातील सर्वात लांब सागरी पूल म्हणून २२ किलोमीटर लांबीच्या अटल सेतूची नोंद आहे. मात्र, भाईंदर-विरार सागरी सेतू पूर्ण झाल्यानंतर तो हा विक्रम मोडून देशातील सर्वात लांब सागरी पूल ठरणार आहे. या प्रकल्पासाठी डिसेंबर २०२६ अखेरपर्यंत टेंडर प्रसिद्ध करण्याचे एमएमआरडीएचे नियोजन असून, २०२७ मध्ये प्रत्यक्ष कामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.