
मुंबई (Mumbai): केंद्र सरकारचा महत्त्वाकांक्षी मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प पूर्ण होण्यास डिसेंबर २०२९ पर्यंतचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. ही बुलेट ट्रेन ताशी ३२० किमी वेगाने धावेल.
गुजरातमधील वापी – साबरमतीदरम्यान डिसेंबर २०२७ पर्यंत बुलेट ट्रेन प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन आहे. तर, मुंबई – साबरमती हा टप्पा डिसेंबर २०२९ पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.
दरम्यान, बुलेट ट्रेनमुळे होणारे ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी या संपूर्ण मार्गावर ध्वनी अवरोधक बसवण्यात येणार आहेत. आतापर्यंत १८८ किमी मार्गावर ३.७७ लाख ध्वनी अवरोधक बसविण्यात आले आहेत. तर, येत्या काळात २७१ किमी मार्गावर ५.४२ लाख ध्वनी अवरोधक बसविण्यात येणार आहेत.
देशातील पहिल्या मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेनची मुहूर्तमेढ १४ सप्टेंबर २०१७ रोजी रोवण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे तत्कालीन पंतप्रधान शिंजो आबे यांच्या उपस्थितीत अहमदाबाद येथे या प्रकल्पाचा नारळ फुटला. जपानच्या शिंकान्सेन तंत्रज्ञानाचा वापर करून याची अंमलबजावणी करण्यात येत आहे.
मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेनचे एकूण अंतर ५०८ किमी इतके आहे. यापैकी आतापर्यंत, ३९२ किमी घाट बांधकाम, ३२९ किमी गर्डर कास्टिंग आणि ३०८ किमी तुळ्या उभारणीची कामे पूर्ण झाली आहेत. यासह वांद्रे-कुर्ला संकुल–ठाणेदरम्यान आणि ठाणे खाडीखालील बोगद्याचे काम सुरू झाले आहे.
बुलेट ट्रेन प्रकल्प खाडी भाग, डोंगराळ प्रदेश, नागरी वस्तीमधून जाणार आहे. विशेषतः बुलेट ट्रेन नागरी भागातून जात असताना प्रचंड ध्वनिप्रदूषण होण्याची शक्यता आहेत. ट्रेनच्या मुख्यतः रुळाच्या घर्षणाने येणाऱ्या कर्कश आवाजाने मानवी आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बुलेट ट्रेन मार्गाच्या दोन्ही बाजूला ध्वनी अवरोधक बसवून आवाज कमी केला जाणार आहे.
बुलेट ट्रेन प्रकल्पाचे गुजरातमधील काम वेगात झाले आहे. आतापर्यंत १८८ किमी मार्गावर ३.७७ लाख ध्वनी अवरोधक बसविण्यात आले आहेत. तर, येत्या काळात २७१ किमी मार्गावर ५.४२ ध्वनी अवरोधक बसविण्यात येणार आहेत.
सूरत, आणंद आणि अहमदाबाद येथील कारखान्यात ध्वनी अवरोधक तयार करण्यात आले आहेत. हे रेल्वे पातळीपासून २ मीटर उंच आणि १ मीटर रुंद काँक्रीट पॅनेल आहेत. प्रत्येक ध्वनी अवरोधक अंदाजे ८३०-८४० किलो वजनाचा आहे. ध्वनी अवरोधकामुळे ध्वनिप्रदूषण कमी होण्यास मदत होणार आहे, असे नॅशनल हाय स्पीड रेल कार्पोरेशन लिमिटेडकडून (एनएचएसआरसीएल) सांगण्यात आले.