
मुंबई (Mumbai): बदलापूर (कासगाव) ते पनवेल मार्गे नवी मुंबई (कामोठे) अशा 34 किलोमीटर लांबीच्या नवीन रेल्वे मार्गासाठी मध्य रेल्वेने सर्वेक्षण सुरू केले आहे.
कल्याण, डोंबिवली, आणि ठाणे यांसारख्या रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी असते. त्यामुळे प्रवाशांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. नवीन रेल्वे मार्गामुळे या गर्दीचे विकेंद्रीकरण होण्यास मोठी मदत होईल, अशी अपेक्षा आहे. प्रस्तावित मार्गावर बदलापूरजवळ कासगाव (चामटोली) येथे एक नवीन रेल्वे स्थानक उभारण्याचीही योजना आहे.
माजी नगराध्यक्ष राम पातकर यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे या प्रस्तावित मार्गासाठी सहकार्य करण्याची मागणी केली होती. गडकरी यांनी या मागणीचे महत्त्व लक्षात घेऊन रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र लिहिले. या पत्राची दखल घेत रेल्वे प्रशासनाने तातडीने कार्यवाही सुरू केली आहे. रेल्वे मंत्रालयाच्या सूचनेनुसार, बांधकाम आणि सर्वेक्षण विभागाने मागील वर्षापासूनच कामाला सुरुवात केली आहे.
या नवीन मार्गामुळे कर्जत, बदलापूर आणि अंबरनाथ परिसरातील प्रवाशांना थेट नवी मुंबईत पोहोचणे सोपे होईल. यामुळे कल्याण आणि ठाण्यावरील ताण मोठ्या प्रमाणात कमी होईल, असे उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघाच्या अध्यक्षा लता अरगडे यांचे मत आहे.
अरगडे यांनी मुंबई, नवी मुंबईला जाण्यासाठी पर्यायी रेल्वे मार्गाची तातडीची गरज असल्याचे म्हटले आहे. याशिवाय, कल्याण-कळवा मार्गे वाशी रेल्वे सुरू करण्यासाठीही प्रयत्न होणे गरजेचे आहे, अशी मागणीही त्यांनी केली. भविष्यात या नवीन रेल्वे मार्गामुळे मुंबई उपनगरीय रेल्वे वाहतुकीला एक मजबूत पर्याय उपलब्ध होईल. रेल्वे मंत्रालयाच्या या सकारात्मक भूमिकेमुळे या परिसरातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
कर्जत, बदलापूर आणि अंबरनाथ यांसारख्या शहरांचा वेगाने विकास होत आहे, त्यामुळे या भागाला आता 'चौथी मुंबई' म्हणून ओळख मिळाली आहे. येथे मोठ्या प्रमाणात नवीन गृहप्रकल्प उभे राहिले आहेत. मात्र, मुंबईला जाण्यासाठी कल्याण-ठाणे हा एकमेव रेल्वे मार्ग असल्याने या मार्गावरील प्रवाशांची गर्दी दिवसेंदिवस वाढत आहे. या समस्येवरही यामुळे तोडगा निघणार आहे.