
मुंबई (Mumbai): दक्षिण मुंबईसाठी अत्यंत महत्वाचा प्रकल्प वाहतूक असलेल्या प्रस्तावित भूमिगत मेट्रो लाईन-११ ला (Metro-11) तात्काळ मंजुरी द्यावी, अशी विनंती समाजवादी पक्षाचे (सपा) आमदार रईस शेख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली आहे. दक्षिण मुंबईतील दाट लोकवस्तीमधील लाखों नागरिकांचा दैनंदिन प्रवास या प्रकल्पामुळे सुलभ होणार आहे, असा दावा शेख यांनी फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रात केला आहे.
यासंदर्भात बोलताना आमदार शेख म्हणाले की, ‘आणिक आगर-वडाळा ते गेटवे ऑफ इंडिया मेट्रो प्रकल्पाचे संरेखन ‘मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन’ने (एमएमआरसी) पूर्ण केले आहे. पर्यावरण आणि सामाजिक परिणाम मूल्यांकन (ईएसआयए) अहवाल कंपनीच्या संकेतस्थळावर प्रकाशित केला असून २० ऑगस्ट २०२५ पर्यंत यावर नागरिकांच्या सूचना आणि हरकती मागवल्या आहेत.
दक्षिण मुंबईतील भायखळा, भेंडी बाजार, मोहम्मद अली रोड आणि महात्मा फुले मंडई - या दक्षिण मुंबईतील दाट लोकवस्तीच्या भागात सार्वजनिक वाहतुकीची मोठी कमतरता आहे. मेट्रो लाईन-११ मुळे येथील वाहतूक कोंडी आणि प्रदूषण मोठ्या प्रमाणात कमी होणार असून प्रवाशांना त्याचा दैनंदिन दिलासा मिळणार आहे, असे शेख यांनी म्हटले आहे.
आमदार शेख पुढे म्हणाले की, १७.५१ किमी लांबीच्या या पूर्णपणे भूमिगत मेट्रो प्रकल्प मार्गात १४ स्थानके आहेत. आणिक आगर, वडाळा ट्रक टर्मिनल, सीजीएस कॉलनी, गणेश नगर, बीपीटी हॉस्पिटल, शिवडी, हे बंदर, दारुखाना, भायखळा, नागपाडा, भेंडी बाजार, महात्मा ज्योतिबा फुले मंडई (क्रॉफर्ड मार्केट), हॉर्निमन सर्कल आणि गेटवे ऑफ इंडिया या ठिकाणांना जोडणारा हा मेट्रो-११ प्रकल्प आहे.
या प्रदेशातील सार्वजनिक वाहतुकीच्या मागण्या वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत. हा प्रकल्प दक्षिण मुंबईसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. राज्य सरकारने तो लवकरात लवकर मंजूर करणे आवश्यक असून मुख्यमंत्र्यांनी या प्रकल्पाची मंजुरी प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करावी, अशी विनंती आमदार शेख यांनी पत्रामध्ये केली आहे.