
मुंबई (Mumbai): मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने (एमएमआरसीएल) आरे मेट्रोस्थानक ते गोरेगाव फिल्मसिटीदरम्यान रोप-वे सेवा सुरू करण्याची चाचपणी सुरू केली आहे. हा रोपवे सुमारे दोन ते तीन किलोमीटर लांबीचा असेल.
एमएमआरसीएल या प्रकल्पासाठी तांत्रिक व्यवहार्यता अहवाल तयार करणार आहे. यामध्ये भूगोल, सुरक्षितता, पर्यावरणीय परिणाम, खर्च आणि पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप मॉडेलच्या शक्यता यांचा सविस्तर अभ्यास केला जाणार आहे.
मुंबई शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या या मार्गामुळे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, फिल्मसिटी आणि आरे कॉलनीपर्यंतची प्रवास सुविधा अधिक जलद, सोपी आणि पर्यावरणपूरक होणार आहे. या रोपवेच्या माध्यमातून दर तासाला अंदाजे दोन हजार ते तीन हजार प्रवासी प्रवास करू शकतील, असा प्राथमिक अंदाज आहे.
हा रोपवे फक्त आरे ते चित्रनगरीपुरता मर्यादित न ठेवता, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानापर्यंत वाढवण्याची शक्यता आहे. त्यामुळे वनपर्यटनास चालना मिळेलच, शिवाय जंगलातील संवेदनशील परिसरात विनाप्रदूषण आणि वाहतुकीचा भार न वाढवता पर्यटनाची गती वाढेल. एमएमआरसीएल लवकरच या प्रकल्पासाठी तांत्रिक व्यवहार्यता अहवाल तयार करणार आहे. यामध्ये भूगोल, सुरक्षितता, पर्यावरणीय परिणाम, खर्च आणि पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप मॉडेलच्या शक्यता यांचा सविस्तर अभ्यास केला जाणार आहे.
सध्या गोरेगाव आणि आरे कॉलनी परिसरात वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर जाणवते. या मार्गावर सार्वजनिक वाहतूक पुरेशी नसल्यामुळे पर्यटक आणि स्थानिक रहिवाशांना मोठा त्रास होतो. रोपवे सेवा ही जलद, सुरक्षित आणि हरित पर्याय ठरू शकते. शिवाय पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे प्रदूषणावरही नियंत्रण ठेवता येईल.
चित्रनगरी, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि आरे परिसर हे पर्यटकांची आवडती स्थळे आहेत; परंतु अद्याप या भागात जाण्यासाठी पुरेशी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उपलब्ध नाही. रोप-वेमुळे या भागांना जोडणारा एक नवा पर्यटन-अनुकूल प्रवासमार्ग तयार होणार असून, देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पर्यटकांसाठी ही सुविधा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे.