

मुंबई (Mumbai): प्रवाशांना घरापासून ते थेट कामाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी मुंबई एमएमआर क्षेत्रातील महापालिकांनी पॉड टॅक्सी सुरू करण्यासाठी आराखडा तयार करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे दिले. (Pod Taxi In Mumbai)
मेट्रो आणि लोकल प्रवासाला पूरक अशी ‘पॉड टॅक्सी’ सेवा एमएमआरमधील शहरांत सुरू करण्याबाबत सविस्तर आढावा उपमुख्यमंत्री शिंदे यांनी घेतला. नागरिकांना 'लास्ट माईल कनेक्टिव्हिटी' देण्यास महापालिकांनी प्राधान्य द्यावे, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
नंदनवन येथे झालेल्या या आढावा बैठकीस उपमुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव असीम गुप्ता, प्रधान सचिव नविन सोना, ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव, एमएमआरडीएचे अतिरिक्त आयुक्त अश्विन मुदगल, ठाण्याचे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ आदी उपस्थित होते.
शिंदे म्हणाले की, प्रवाशांना घरापासून रेल्वे किंवा मेट्रो स्टेशनपर्यंत आणि तिथून गंतव्य स्थान हा टप्पा पार करण्यासाठी रिक्षा किंवा बसवर अवलंबून राहावे लागते. यासाठी होणारी गर्दी, तसेच रस्त्यावरील वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून पॉड टॅक्सी चालवण्याचे नियोजन करावे. यामुळे मेट्रोचा वापर वाढण्यास मदत होईल आणि रस्त्यांवरील खासगी वाहनांचा भार कमी होईल. हा प्रकल्प राबवण्यासाठी एमएमआरडीएची मदत घेण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले आहेत.
महापालिकांनी आपल्या विकास आराखड्यात लास्ट माईल कनेक्टिव्हिटीला सर्वोच्च प्राधान्य द्यावे. या सेवेमुळे प्रवाशांचा वेळ वाचणार असून इंधन बचतीमुळे पर्यावरणाचे रक्षण होईल, असेही उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले