
मुंबई (Mumbai) : नवी मुंबईचा पॉश पाम बीच मार्गावर सिडकोने राज्यातील आमदार, खासदारांसाठी प्रस्तावित केलेला आलिशान घरांचा गृहप्रकल्प वादात अडकण्याची दाट शक्यता आहे. १२७० ते १८०० चौरस फूट आकाराच्या या घरांची विक्री किंमत २ कोटी २५ लाख रुपयांपासून ते ३ कोटी ११ लाखांपर्यंत असणार आहे. याच भागात खासगी बिल्डरच्या १८०० ते २००० चौरस फुटांच्या घराचा मार्केट रेट १० ते १३ कोटी रुपये असताना सिडको आमदार, खासदारांसाठी मात्र अवघ्या २५ टक्के किंमतीतच आलिशान घरे देणार आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना बाजारदरात महागडी घरे बांधून देणाऱ्या सिडकोचे लोकप्रतिनिधींसाठी मात्र दुटप्पी धोरण दिसून येते.
नवी मुंबई आंतराराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पापासून चार ते पाच किलोमीटर अंतरावर हा परिसर आहे. पाम बीच मार्गाला एका बाजूला विस्तीर्ण खाडीकिनारा लाभला आहे. या मार्गाला लागूनच सिडकोने काही वर्षांपूर्वी अनिवासी भारतीयांसाठी मोठा प्रकल्प उभारला. याच मार्गावर बेलापूरच्या दिशेने नवी मुंबई महापालिकेने अद्ययावत असे मुख्यालय उभारले असून, या मार्गावरील गगनचुंबी इमारतींमधील घरांची मुंबई महानगर क्षेत्रातील महागडया घरांमध्ये गणना होते. आता याच मार्गावर राज्याच्या नगरविकास विभागाच्या परवानगीने सिडकोकडून आमदार, खासदारांसह अतिमहत्वाच्या व्यक्तींसाठी गृहप्रकल्प उभारण्यात येणार आहे. १ जानेवारी २०२० नंतर निवडून आलेले आमदार, खासदार यांच्यासह सर्वोच्च, उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती, आयएएस, आयपीएस अधिकाऱ्यांनाही या प्रकल्पात घरे खरेदी करता येणार आहेत.
मार्च २०२२ मध्ये विधान परिषदेचे तत्कालीन सभापती रामराजे निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या एका बैठकीत सिडकोने अतिमहत्वाच्या व्यक्तींसाठी लॉटरी पद्धतीने विक्रीसाठी अशापद्धतीने घरांची उभारणी करावी, असे निर्देश देण्यात आले होते. त्यासाठी आवश्यक धोरण तयार करण्याचेही सिडकोला सूचविण्यात आले होते. यानुसार सिडकोने जून २०२२ मध्ये पाम बीच मार्गावर सेक्टर १५ ए येथील भूखंड क्रमांक २० येथे ८७५ घरांचा हा प्रकल्प उभा करण्यासाठी विशेष धोरणाला मंजुरी दिली होती. नव्या निर्णयानुसार तीन, साडेतीन आणि चार बेडरुमची ५२५ घरे या प्रकल्पात उभारली जाणार आहेत. या प्रकल्पाच्या उभारणीस संचालक मंडळाची मान्यता मिळाली आहे. पाम बीच मार्गावर वेगवेगळ्या बिल्डरांमार्फत उभारल्या जाणाऱ्या प्रकल्पांमधील घरांच्या किमती सिडकोने आखलेल्या या प्रकल्पांपेक्षा खूपच जास्त आहेत. या मार्गावर नेरुळ परिसरात एका मोठ्या बिल्डरकडून २५ मजली इमारतीचा गृहप्रकल्प उभारण्यात येत असून, त्यामधील १८०० ते २००० चौरस फुटांच्या घराची किंमत १० ते १३ कोटी रुपये आहे. याच भागात १००० चौरस फूट कार्पेट क्षेत्रफळ असलेल्या घरांच्या किमती किमान चार ते साडेचार कोटी रुपयांपासून सुरू होतात, अशी माहिती पुढे आली आहे.