मुंबईतील सर्व कामे दर्जेदारच करावीत; 520 कोटींचा आराखडा मंजूर

Deepak Kesarkar
Deepak KesarkarTendernama

मुंबई (Mumbai) : 2024-25 या आर्थिक वर्षासाठी मुंबई शहर जिल्ह्याच्या 520 कोटी रुपयांच्या प्रारूप आराखड्यास जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिली. यामध्ये सर्वसाधारण योजनेसाठी 500 कोटी रूपये, अनुसूचित जाती उपयोजनेसाठी 20 कोटी रूपये प्रस्तावित असल्याचे त्यांनी सांगितले.

Deepak Kesarkar
Mumbai : 'धारावी पुनर्विकास' टेंडरमध्ये सरकारचे मोठे नुकसान; 'या' कंपनीचा उच्च न्यायालयात दावा

वर्ल्ड ट्रेड सेंटर येथील सभागृहात जिल्हा नियोजन समितीची बैठक मंत्री केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. पालकमंत्री केसरकर म्हणाले, मुंबई हे राजधानीचे तसेच जागतिक दर्जाचे शहर आहे. येथील सर्व कामे दर्जेदार आणि कालबद्ध रितीने पूर्ण करावीत. मुंबई शहरात कोळीवाड्यांच्या विकासाची तसेच सौंदर्यीकरणाची कामे, कामगार कल्याण केंद्रांचे अद्ययावतीकरण, रुग्णालयांचे बळकटीकरण, पोलीस वसाहतींचा पुनर्विकास, शहराचे सौंदर्यीकरण आदींसह विविध नाविण्यपूर्ण उपक्रम राबविले जात आहेत. हाजी अली दर्गा तसेच विविध मंदिर परिसरांचा विकास आणि सौंदर्यीकरणाची कामे केली जात आहेत.

जिल्ह्याच्या विकास कार्यामध्ये महत्त्वपूर्ण बाबींसाठी यावर्षी 135 कोटी रूपयांची अतिरिक्त मागणी प्रस्तावित करण्यात आली असल्याचे मंत्री केसरकर यांनी यावेळी सांगितले. यामध्ये प्रामुख्याने नागरी दलितेतर वस्त्यांमध्ये सुधारणा, रूग्णालयांसाठी औषधे, साहित्य  आणि साधनसामग्री खरेदी, रूग्णालयांचे बांधकाम, विस्तारीकरण, देखभाल, शासकीय महाविद्यालयांचा विकास, महिला सबलीकरण व बालकांचा विकास, मच्छिमार सहकारी संस्थांना साहाय्य, लहान बंदरांचा विकास, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या वर्कशॉपचे बांधकाम, समाजसेवा शिबिर भरविणे, किमान कौशल्य विकास कार्यक्रम, पोलीस वसाहतींसाठी पायाभूत सुविधा पुरविणे आणि क्लोज सर्किट टेलिव्हिजन संनियंत्रण यंत्रणा उभारणे, सार्वजनिक जमिनींवरील अतिक्रमण रोखण्यासाठी संरक्षक भिंत बांधणे, पर्यटन विकासासाठी मूलभूत सुविधा, गड-किल्ले, मंदिरे व महत्त्वाची संरक्षित स्मारकांचे जतन, विविध नाविन्यपूर्ण योजना, अपारंपरिक ऊर्जा विकास आदी बाबींचा समावेश असल्याची माहिती त्यांनी दिली. हा वाढीव नियतव्यय मिळण्यासाठी राज्यस्तरीय बैठकीत मागणी करण्यात येईल, असे पालकमंत्री  श्री. केसरकर यांनी सांगितले.

Deepak Kesarkar
Mumbai : बीएमसीच्या 'त्या' टेंडरमध्ये मर्जीतील कंत्राटदारासाठी रेड कार्पेट; पुन्हा Tender Scam ?

या बैठकीत मुंबई जिल्ह्याच्या 2023-24 अंतर्गत हाती घेण्यात आलेल्या विविध कामांच्या माहे डिसेंबर 2023 अखेर देण्यात आलेल्या प्रशासकीय मान्यता व झालेला खर्चाचा आढावा आणि 2024-25 मध्ये राबवावयाच्या विविध योजना, हाती घ्यावयाची वैशिष्ट्यपूर्ण कामे व त्यासाठी प्रस्तावित नियतव्यय याबाबतचे सादरीकरण मुंबईचे जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी केले. त्यानुसार जिल्हा वार्षिक योजना सन 2023-24 अंतर्गत मान्यता दिलेली सर्व कामे योग्य नियोजन करून मार्च अखेरीस पूर्ण करावीत, असे निर्देश पालकमंत्री केसरकर यांनी दिले. यावेळी उपस्थित लोकप्रतिनिधींनी त्यांच्या मतदारसंघातील विविध समस्या मांडल्या, त्यानुसार संबंधित विभागांनी बैठकीत करण्यात आलेल्या मुद्यांची दखल घेऊन विनाविलंब कार्यवाही करण्याचे निर्देश पालकमंत्री केसरकर यांनी दिले.

या बैठकीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, खासदार राहूल शेवाळे, आमदार सर्वश्री सदा सरवणकर, सचिन अहिर, कालीदास कोळंबकर, अमिन पटेल, कॅ.तमिल सेल्वन, सुनील शिंदे, अजय चौधरी यांच्यासह समिती सदस्य, मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव भूषण गगराणी, जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर, जिल्हा नियोजन अधिकारी जी.बी.सुपेकर तसेच संबंधित सर्व विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com