
मुंबई (Mumbai) : जोगेश्वरी पूर्व येथील पूनमनगर पीएमजीपी वसाहतीचा पुनर्विकास म्हाडा करणार आहे. त्यासाठी म्हाडाने टेंडर प्रक्रिया सुरू केली आहे. येथील 984 कुटुंबाना 180 चौरस फुटांच्या घरांच्या बदल्यात 450 चौरस फुटांचे सोयीसुविधांयुक्त घर मिळणार आहे. या पुनर्विकास कामासाठी साडेतीन वर्षांचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे.
अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या जोगेश्वरी (पूर्व) येथील पूनमनगर, मेघवाडी या पंतप्रधान अनुदान प्रकल्पातील (पीएमजीपी) वसाहतीच्या पुनर्विकासाची प्रक्रिया सुरू झाली आहे. महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणामार्फत (म्हाडा) या वसाहतीच्या पुनर्विकासासाठी ईपीसी कंत्राटदाराची नेमणूक करण्यासाठी टेंडर प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे. सुमारे 27 हजार 625 चौ. मी. क्षेत्रफळावर वसलेल्या पूनमनगर पीएमजीपी वसाहतींचा पुनर्विकास केला जाणार आहे. हा प्रकल्प सुमारे साडेतीन वर्षांच्या कालावधीत पूर्ण करण्याचा म्हाडाचा संकल्प असून म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प राबवला जात आहे. या प्रकल्पासाठी टेंडर सादर करण्याची अंतिम तारीख 7 जुलै 2025 पर्यंत आहे.
प्रकल्पाच्या माध्यमातून सुमारे 984 कुटुंबीयांना अत्याधुनिक घरे मिळणार आहेत. 1990-92 दरम्यान पंतप्रधान अनुदान प्रकल्पांतर्गत उभारण्यात आलेल्या या वसाहतीत तळमजला अधिक 4 मजले असलेल्या एकूण 17 इमारती आहेत. या वसाहतीमध्ये 942 निवासी व 42 अनिवासी अशी एकूण 984 कुटुंबे राहतात.