

मुंबई : नवी मुंबई आणि मुंबईकरांसाठी चांगली बातमी आहे. नवी मुंबईतील उपनगरांना थेट जोडणारी आणि मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ अशी थेट कनेक्टिव्हिटी निर्माण करणारी मेट्रो-८ मार्गिका उभारण्याच्या दिशेने ठोस पाऊले टाकण्यात आली आहेत.
राज्य सरकारच्या मंजुरीनंतर या प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) तयार झाला असून, अंमलबजावणीची जबाबदारी सिडकोकडे सोपवण्यात आली आहे.
मेट्रो-८ ही एमएमआरडीएच्या ३३७ किमीच्या विस्तृत मेट्रो नेटवर्कचा महत्त्वाचा भाग ठरणार असून, नवी मुंबईच्या पायाभूत विकासात हा प्रकल्प मैलाचा दगड ठरेल. दोन आंतरराष्ट्रीय विमानतळांना जोडणारी ही मार्गिका असल्याने, ती भविष्यात मुंबई महानगर प्रदेशातील अत्यंत व्यस्त व महत्त्वाची ‘अंतर्गत मेट्रो’ म्हणून ओळखली जाणार आहे.
मानखुर्द ते थेट एनएमआयए
मेट्रो-८ मानखुर्द येथून वाशी खाडी पूल ओलांडत नवी मुंबईत प्रवेश करेल. त्यानंतर ही मेट्रो सायन-पनवेल महामार्गालगत वाशी, सानपाडा आणि जुईनगर परिसरातून धावेल. नेरुळच्या एलपी जंक्शन परिसरातून आत वळण घेत ही मार्गिका डी.वाय. पाटील विद्यापीठाजवळील प्रस्तावित स्थानकापर्यंत पोहोचेल.
यानंतर नेरुळ-सीवूड्स मार्गे ही मेट्रो उलवे नोडच्या दिशेने जाईल. वंडर्स पार्क परिसरात, अपोलो हॉस्पिटल कॅम्पस व नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयाच्या पाठीमागील भागातून पुढे जात, वेगाने विकसित होत असलेल्या सागर संगम, तरघर/मोहा भागांना सेवा देईल. येथून ही मार्गिका थेट नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात प्रवेश करेल.
नवी मुंबईतील प्रस्तावित ११ स्थानके
मेट्रो-८ मार्गिकेवर नवी मुंबईतील एकूण ११ स्थानके प्रस्तावित आहेत. वाशी, सानपाडा, जुईनगर, नेरुळ सेक्टर-१, नेरुळ, सीवूड्स, बेलापूर, सागर संगम, तरघर/मोहा, एनएमआयए पश्चिम आणि एनएमआयए टर्मिनल-२.
सिडकोकडे संपूर्ण जबाबदारी
सुरुवातीला हा प्रकल्प सिडको आणि एमएमआरडीए यांच्या संयुक्त विद्यमाने राबवण्याचा विचार होता. मात्र, आता संपूर्ण अंमलबजावणीची जबाबदारी सिडकोकडे देण्यात आली असून, हा प्रकल्प सार्वजनिक-खाजगी भागीदारी (PPP) मॉडेल अंतर्गत राबवला जाणार आहे.
विमानतळ लवकरच सुरू होणार
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ २५ डिसेंबरपासून सुरू होण्याची अपेक्षा आहे. त्या पार्श्वभूमीवर मेट्रो-८चे महत्त्व अधिक वाढले आहे. या मार्गिकेमुळे मुंबईहून नवी मुंबई विमानतळावर थेट, जलद आणि विश्वासार्ह प्रवास शक्य होणार असून, दोन्ही विमानतळांमधील प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या कमी होईल.
विकासाच्या केंद्रस्थानी नवी मुंबई
विमानतळ, मेट्रो, रस्ते आणि नव्या नोड्सच्या विकासामुळे नवी मुंबई देशातील पायाभूत विकास प्रकल्पांचे केंद्रस्थान ठरत आहे. मेट्रो-८मुळे केवळ दळणवळण सुलभ होणार नाही, तर नवी मुंबईची आर्थिक, सामाजिक आणि शहरी गती अधिक वेगवान होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.