

मुंबई (Mumbai): मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणारा चौथा आणि अत्यंत महत्त्वाकांक्षी 'गोरेगाव-मुलुंड लिंक रोड' (GMLR) प्रकल्प आता निर्णायक टप्प्यात पोहोचला आहे.
उत्तर मुंबईतील वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी तोडगा काढणाऱ्या या प्रकल्पात 'दादासाहेब फाळके फिल्म सिटी' येथे ५.३ किलोमीटर लांबीचा, तीन पदरी जुळा बोगदा बांधण्याचे मोठे अभियांत्रिकी आव्हान आहे. या आव्हानावर मात करण्यासाठी लागणारे अत्याधुनिक टनेल बोरिंग मशीन (TBM) जपानमधून मुंबईत दाखल झाले असून, त्यामुळे या महाकाय प्रकल्पाच्या कामाला गती मिळाली आहे.
जपानहून ७७ कंटेनरमध्ये आयात केलेल्या दोन अत्याधुनिक टीबीएमपैकी एका मशीनचे सर्व सुटे भाग गोरेगाव येथील जोश मैदानात पोहोचले आहेत. दुसऱ्या मशीनचे सुटे भाग डिसेंबर २०२५ पर्यंत येणे अपेक्षित आहे. मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी नुकतीच या कामाची पाहणी करून वेळेवर प्रकल्प पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत.
हे बोगदे मुंबई महानगर प्रदेशातील सर्वात मोठे बोगदे ठरतील. प्रत्येकी अंदाजे ५.३ किलोमीटर लांबीचे जुळे बोगदे टनेल बोरिंग मशीन वापरून खोदले जातील, तर बॉक्स बोगद्यांसह त्यांची एकूण लांबी अंदाजे ६.६२ किलोमीटर असेल. प्रत्येक बोगद्याचा बाह्य व्यास तब्बल १४.४२ मीटर असणार आहे.
आतापर्यंत टनेल बोरिंग मशीनसाठी आवश्यक असलेल्या लाँचिंग शाफ्टचे उत्खनन पूर्ण वेगाने सुरू आहे. पहिल्या टीबीएम मशीनच्या घटकांचे कनेक्शन (जोडणी) ऑगस्ट २०२६ पर्यंत पूर्ण होईल, त्यानंतर लगेचच प्रत्यक्ष खोदकामाला सुरुवात होईल.
दुसऱ्या मशीनचे कनेक्शन ऑक्टोबर २०२६ पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. एकदा हा महत्त्वाकांक्षी रस्ता तयार झाल्यावर, तो मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेत लक्षणीय सुधारणा करेल. गोरेगाव-मुलुंड दरम्यानचा प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी होईल आणि हा नवीन मार्ग पश्चिम कोस्टल रोडला मालाड माइंडस्पेसद्वारे थेट ऐरोलीशी जोडेल, ज्यामुळे मालाड ते ऐरोली असा थेट प्रवास शक्य होणार आहे.
तांत्रिक कौशल्य, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि प्रशासकीय इच्छाशक्ती यांचा संगम झालेला हा प्रकल्प मुंबईच्या भविष्यातील वाहतूक गरजा पूर्ण करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे.