Eknath Shinde : 'त्या' विकासकांवर सरकारने का उगारला कारवाईचा बडगा?
मुंबई (Mumbai) : इमारत पुनर्विकासाचे काम अर्धवट सोडून गेलेले आणि ज्यांनी रहिवाशांचे भाडे थकीत ठेवले, अशा कामचुकार विकासकांवर कारवाई करण्यात आली आहे. अशा विकासकांना प्रकल्पातून बाजूला सारण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री व नगरविकास, गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी येथे दिली.
याशिवाय म्हाडाकडून सुधारित गृहनिर्माण धोरणाचा मसुदा तयार करण्यात येत असून या धोरणात समाजातील विविध घटकांसाठी घरे राखीव ठेवण्यात आल्याचेही शिंदे यांनी सांगितले.
मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे यांनी मुंबईकरांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांना हात घालण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार त्यांनी दादर, माहीम आणि प्रभादेवी येथे जाऊन समूह पुनर्विकास योजनांचा आढावा घेतला. त्यावेळी दादरच्या स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात आयोजित कार्यक्रमात बोलताना शिंदे यांनी पुनर्विकासाचे प्रकल्प अर्धवट सोडणाऱ्या विकासकांवर राज्य सरकारने कारवाई केल्याचे सांगितले.
म्हाडाच्या सुधारित गृहनिर्माण धोरणात ज्येष्ठ नागरिक, नोकरी करणाऱ्या महिला, पोलिस, गिरणी कामगार यांना परवडणारी घरे दिली जाणार आहेत. यासाठी घरांची निर्मिती करताना गुणवत्तेत तडजोड केली जाणार नसल्याचेही शिंदे यांनी स्पष्ट केले.
सर्वसामान्यांना परवडणारी आणि प्रशस्त घरे देण्यासाठी वेळ पडल्यास नियम, कायद्यात बदल करावे लागल्यास तेही करण्यात येतील. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून मंत्रिमंडळाच्या समोर असे प्रस्ताव आणले जातील, असेही शिंदे यांनी यावेळी सांगितले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा येत्या ९ फेब्रुवारी रोजीचा ६१ वा वाढदिवस हा राज्यभरात ‘कॉमन मॅन दिन’ म्हणून साजरा करण्यात येणार आहे. या माध्यमातून राज्यातील ३६ जिल्ह्यांमधील प्रत्येकी ६१ सर्वसामान्य नागरिकांचा सन्मान युवासेनेतर्फे करण्यात येईल, अशी माहिती युवासेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत दिली.