
मुंबई (Mumbai): ठाण्यातील मेट्रो रेल्वेची ट्रायल रन पुढील महिन्यात होणार असून डिसेंबर २०२५ ला प्रत्यक्ष मेट्रो धावणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिली आहे. त्यामुळे ठाण्यातील रस्त्यावरील वाहतुकीचा भार कमी होऊन कोंडीतून दिलासा मिळेल अशी अपेक्षा आहे.
मेट्रो- ४ ही ३२.३२ किमी तर मेट्रो- ४ अ ही २.७ किमी लांबीची मार्गिका आहे. या दोन्ही मार्गिकेवर एकूण ३२ स्थानके असणार आहेत. तीन टप्प्यात विभागलेला वडाळा ते कासारवडवलीपर्यंत विस्तारीत मार्ग जवळपास ८५ टक्के पूर्ण झाला आहे. तर कासारवडवली ते गायमुख यांना जोडणारा ग्रीनलाईन ४ अ चा विस्तार ९० टक्के पूर्ण झाला आहे.
मुंबईत धावणारी मेट्रो ठाण्यात यावी यासाठी काही वर्षांपूर्वी येथील लोकप्रतिनिधींनी प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नामुळे ठाण्यात मेट्रोच्या कामाला सुरुवात झाली. आधी ठाणे आणि नंतर या मेट्रोचे जाळे भाईंदरपर्यंत पसरवत खूप मोठा पल्ला यामुळे पार पडणार आहे.
या कामामध्ये अनेक अडथळे आले. पण या सर्वांवर मात करत मेट्रो प्रकल्पाचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. मेट्रोसाठी डिसेंबर २०२५ ची डेडलाईन देण्यात आली आहे. पण ठरलेल्या वेळेत मेट्रो धावणार की प्रतीक्षा वाढणार याची धाकधूक वाढली होती. अखेर यासंदर्भात उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिलासा देणारी माहिती दिली आहे.
ठाणे महापालिका वर्षा मॅरेथॉन कार्यक्रमानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी वडाळा ते कासारवडवली मेट्रो ४ आणि कासारवडवली ते गायमुख मेट्रो ४ अ मार्गावर चाचणी फेरी सप्टेंबर महिन्यात घेण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे. तसेच डिसेंबर २०२५ पर्यंत प्रत्यक्षात मेट्रोची सेवाही सुरू होईल असे त्यांनी सांगितले.
सध्या ठाणेकर प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करत आहेत. मेट्रो सुरू झाल्यानंतर सार्वजनिक वाहतुकीचा सक्षम पर्याय उपलब्ध होणार आहे. त्यामुळे रस्त्यावरची रहदारी कमी होईल आणि कोंडीतून सुटका मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच मेट्रोला जोडणार्या अंतर्गत मेट्रोचे कामही सुरू झाले आहे. मेट्रोला अंतर्गत मेट्रोची जोड मिळाल्यास ठाणेकरांचा प्रवास अधिक सुखकर होणार असल्याचे ते म्हणाले.
ठाण्यातील वाहतूक कोंडी हा देखील विषय मार्गी लावत आहे. मेट्रोचाही निश्चित फायदा होईल. मुंबईपासून थेट ठाण्यापर्यंत कोस्टल रोड करत आहोत. ठाण्यातून खाडी साकेतमार्गे गायमुखवरुन फाऊंटनकडे जाणार आहे. तिथून थेट मीरा भाईंदरजवळून थेट अहमदाबाद महामार्गाला जोडले जाणार आहे. त्यामुळे ठाण्यातील वाहतूक कोंडी बाहेरून जाणार आहे. हा देखील आपल्या ठाण्यासाठी मोठा प्रकल्प ठरेल, असे शिंदे म्हणाले
ठाणेकरांचा मेट्रो प्रवास कसा होणार?
- कासारवडवली ते कॅडबरी जक्शन हा पहिला भाग डिसेंबर २०२५ पर्यंत पूर्ण होईल.
- गायमुख ते कॅडबरी जंक्शन या मार्गावर मेट्रोच्या ट्रायल रन घेतल्या जाणार आहेत.
- आरडीओएसकडून मेट्रो गाड्यांची चाचणी केली जाणार आहे. या तपासण्या २०२५ च्या अखेरपर्यंत पूर्ण होणार आहेत.
- कॅडबरी जक्शन ते गांधीनगर हा भाग २०२६ पर्यंत पूर्ण होईल.
- पण वडाळापर्यंतच्या प्रवासासाठी २०२७ पर्यंत वाट पहावी लागेल अशी शक्यता आहे.