मुंबई (Mumbai) : महाराष्ट्राच्या जनतेच्या जीवनात सुखाचे, समाधानाचे क्षण यावेत. त्यासाठीच आम्ही धोरण आखतो आणि त्यावरच काम करतो. राज्याचा विकास हेच आमचे महाराष्ट्रासाठीचे व्हिजन आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. मुंबईत एका कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदे बोलत होते.
सामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवूनच आम्ही काम करत आहोत, असे नमूद करून मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, 'आमचे शासन येताच जनतेच्या हिताचे प्रकल्प सुरु केले. मग तो मेट्रो कारशेडचा प्रकल्प असेल किंवा अन्य महत्वाकांक्षी प्रकल्प. महाराष्ट्राच्या सर्वदूर भागात आज विकास कामांची घौडदोड सुरु आहे. महाराष्ट्र हे पायाभूत सुविधांच्या प्रकल्पाच्या बाबतीत देशातील पहिल्या क्रमाकांच राज्य आहे. यात शिवडी न्हावा-शेवा अटल सेतू, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग, मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वे शी संबंधित मिसींग लींक, मेट्रोचे ३३७ किलोमीटरचे जाळे, वर्सोवा ते पालघर पर्यंतचे तीन कोस्टल रोड, जे ठाणे, रायगड आणि पालघर यांना जोडणारे आहेत. या सर्व प्रकल्पांतून सामान्य जनतेला फायदा होणार आहे. त्यांच्यासाठी हे प्रकल्प गेमचेंजर ठरणार आहेत. समृद्धी महामार्गामुळे शेतमाल वेगाने शहरात पोहचवता येणार आहे. हे सर्व पर्यावरणपूरक व्हावेत, लोकाभिमुख व्हावेत असाच प्रयत्न केल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले.
शपथविधीनंतरच्या पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत राज्यातील सिंचन प्रकल्पांची कामे मार्गी लावण्यास, जलयुक्त शिवार अभियानाला गती देण्याचा आणि शेतकरी हिताचे निर्णय घेण्यास प्राधान्य देण्याचा निर्णय घेतल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, मराठवाडा वॉटर ग्रीडचा प्रकल्प गुंडाळून ठेवण्यात आला होता, त्याला आपण गती दिली. राज्यात आता १२० सिंचन प्रकल्प मार्गी लावले आहेत, त्यामुळे सुमारे १२ लाख हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. देशाला फाईव्ह ट्रीलियनची अर्थव्यवस्था बनवण्याचे स्वप्न देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी डोळ्यासमोर ठेवले असून त्यात एक ट्रीलियन डॉलरची भर महाराष्ट्र टाकेल, त्यासाठी राज्याला प्रगतीपथावर नेण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या जात असल्याचे मत यावेळी व्यक्त केले. महिला, शेतकरी, कष्टकरी, विद्यार्थी सर्वांना न्याय देणारे लोकाभिमुख निर्णय घेतले आहेत, असेही त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री म्हणाले की, महिला सक्षमीकरणासाठी आपण अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले, लेक लाडकी लखपती, महिलांना एसटी बस प्रवासासाठी पन्नास टक्के सवलत दिल्याने त्यांच्या अनेक गोष्टी सुलभ झाल्या. यातूनच आमच्या विकासाचा लाभ त्यांच्यापर्यत पोहचल्याचे आपण पाहतोय. शासन आपल्या दारी, कौशल्य विकास आणि नमो महारोजगार मेळाव्यातून आपण थेट नागरिकांपर्यंत पोहचत आहोत. पायाभूत सुविधांचा विकास, शिक्षण आणि आरोग्य, कौशल्य विकास या क्षेत्रातील आमुलाग्र बदल यासाठी प्रयत्न सुरू आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्रांचे अपग्रेडेशन करणे सुरू आहे. आता पाच लाख रुपयांपर्यंतचे उपचार मोफत मिळतील, अशी व्यवस्था निर्माण केली आहे. गुंतवणुकीच्या क्षेत्रातही महाराष्ट्राची जगभर उद्योगस्नेही आणि मनुष्यबळ, कायदा-सुव्यवस्था या दृष्टीने चांगली राज्य अशी ओळख आहे. गतवेळी आपल्याला दावोस येथील परिषदेतून एक लाख ३७ हजार कोटींची गुंतवणूक मिळाली होती. यंदा तीन लाख ७३ हजार कोटींचे गुंतवणूक करार करण्यात यश आले आहे. यातूनही लाखो रोजगार संधी उपलब्ध होणार असल्याचेही मुख्यमंत्री यांनी यावेळी सांगितले.
‘आपला महाराष्ट्र, आपलं व्हिजन’ अशी भूमिका घेऊन आम्ही काम करत आहोत. यातून महाराष्ट्रातील जनतेच्या जीवनात सुखाचे, समाधानाचे क्षण यावेत, असेच धोरण आखतो आहोत, त्यासाठीच आम्ही काम करत आहोत. विकास हेच आमचे व्हिजन आहे, असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले. यावेळी त्यांनी मराठा समाजाला दिलेले आरक्षण कायद्याच्या कसोटीवर टिकेल असेही ठामपणे सांगितले. या आरक्षणामुळे अन्य कुठल्याही समाजावर, ओबीसींवर अन्याय होणार नसल्याची भूमिकाही त्यांनी मांडली.