चैत्यभूमी ते इंदूमिल रस्ता रुंदीकरणाला वेग

जागा हस्तांतरणासाठी महसूल विभाग व एमएमआरडीएचे अभिप्राय तातडीने घेण्याच्या सूचना; रस्त्याच्या कामासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वय साधण्याचे निर्देश
Mantralaya
MantralayaTendernama
Published on

मुंबई (Mumbai): दादर येथील चैत्यभूमीपासून इंदूमिलपर्यंत जाणाऱ्या विद्यमान रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामाला वेग देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी अंदाजपत्रक तातडीने तयार करावे, तसेच आवश्यक जागेच्या हस्तांतरणासाठी महसूल विभाग आणि एमएमआरडीएचे अभिप्राय तत्काळ मिळवावेत, अशा सूचना विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी दिल्या.

Mantralaya
Nashik: गंगापूर रोडला समांतर रस्त्याला अखेर कुंभमेळा प्राधिकरणची मान्यता; डाव्या कालव्यावरील रस्तावर फुली

अशोकस्तंभ ते चैत्यभूमी मुख्य स्तूप या विद्यमान रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामाच्या सद्य:स्थितीचा बनसोडे यांनी आढावा घेतला. येत्या ६ डिसेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रस्ता रुंदीकरणाच्या कामाचे उद्घाटन करण्याचे नियोजन असल्याने संबंधित सर्व विभागांनी समन्वय साधून आवश्यक कार्यवाहीला वेग द्यावा, असे निर्देश त्यांनी दिले.

जागा हस्तांतरणाची प्रक्रिया वेगाने करण्याचे निर्देश

रस्ता रुंदीकरणासाठी आवश्यक जागेचे प्रस्ताव ऑफलाइन तसेच ऑनलाइन पद्धतीने पाठवावेत. संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष जाऊन जागा हस्तांतरणासंदर्भातील कार्यवाही पूर्ण करावी, अशा सूचनाही देण्यात आल्या. रस्त्याच्या समुद्राकडील बाजूची जमीन मुंबई महापालिकेकडे हस्तांतरित करण्याचा मुद्दाही बैठकीत चर्चिला गेला. चैत्यभूमीपासून जी/उत्तर विभागातील इंदूमिल येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रस्तावित भव्य स्मारकाला हा रस्ता जोडला जाणार आहे. त्यामुळे लाखो अनुयायांना या मार्गाचा फायदा होईल, असे बैठकीत नमूद करण्यात आले.

Mantralaya
द्वारका ते नाशिकरोड 10 पदरी रस्त्याचे काय झाले? 6 महिन्यांपासून टेंडर-टेंडरचा खेळ

रस्त्यालगतच्या परिसराचेही सुशोभीकरण

इंदूमिलपर्यंत रस्ता तयार करण्याबरोबरच रस्त्यालगतच्या परिसराचे सुशोभीकरण करण्याबाबतही चर्चा झाली. महसूल विभाग, पर्यावरण विभाग, मुंबई महापालिका प्रशासन आणि एमएमआरडीएने रस्त्याच्या उभारणीसाठी सकारात्मक कार्यवाही करावी, असे बनसोडे यांनी सांगितले. या कामाच्या प्रगतीचा आढावा पुढील महिन्यात संबंधित विभागांकडून घेतला जाणार आहे.

बैठकीला मुंबई महापालिका, एमएमआरडीए, महसूल विभागाचे प्रशासकीय अधिकारी तसेच चैत्यभूमी व्यवस्थापक समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

Mantralaya
सिंधुदुर्गातील रस्त्यांची गणेशोत्सवापूर्वी दुरुस्ती; प्रमुख मार्गांचे सेफ्टी ऑडिट

Key Points

  • चैत्यभूमी ते इंदूमिल रस्ता रुंदीकरणाच्या कामाला वेग देण्याच्या सूचना,

  • रस्ता रुंदीकरणाचे अंदाजपत्रक तातडीने तयार करण्याचे निर्देश,

  • जागा हस्तांतरणासाठी महसूल विभाग आणि एमएमआरडीएचे अभिप्राय घेण्याच्या सूचना,

  • ६ डिसेंबरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटनाचे नियोजन,

  • समुद्राकडील बाजूची जमीन मुंबई महापालिकेकडे हस्तांतरित करण्याचा मुद्दा,

  • इंदूमिल येथील प्रस्तावित डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाला रस्ता जोडण्याचे नियोजन,

  • रस्त्यालगतच्या परिसराच्या सुशोभीकरणावरही चर्चा,

  • पुढील महिन्यात रस्ता रुंदीकरणाच्या कामाचा प्रगती आढावा घेण्यात येणार.

Tendernama
www.tendernama.com