
मुंबई (Mumbai) : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या महत्त्वकांक्षी मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी शिंकानसेन रेल्वेसोबत रुळही जपानीच वापरले जात आहेत. ताशी ३५० किलोमीटर वेगाने धावणाऱ्या या बुलेट ट्रेनसाठी सध्या रेल्वे रूळ टाकण्याचे काम सुरू झाले आहे. आतापर्यंत ६० किलोमीटरचे रूळ टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे.
बुलेटप्रमाणेच बुलेट ट्रेनची गती असल्याने तिच्या हाय स्पीडची काळजी घेण्यात आली आहे. उच्च गतीमध्ये प्रवास त्रासदायक न होता, तो भयमुक्त आणि पूर्णतः सुरक्षित व्हावा, यासाठी टिकाऊपणा आणि मजबूत रुळाच्या सुरक्षितेतची काळजी घेण्यात आली आहे.
अत्याधुनिक फ्यूजन वेल्डिंग मशीनद्वारे रुळ वेल्डिंग केले जातात. वेल्डिंग करणारी ही यंत्रणासुद्धा जपाननिर्मित आहे. अशा मजबूत रुळाच्या मदतीने बुलेट ट्रेन अवघ्या साडेतीन तासांत ८४४ किलोमीटरचा पल्ला गाठणार आहे.
बुलेट ट्रेनसाठी जपानकडून प्रत्येकी २५ मीटर लांबीचे रेल्वे रूळ खरेदी करण्यात आले आहेत. रुळाच्या मजबुतीचा विचार करूनच वेल्डिंग करण्यापूर्वी रुळाचे शेवटचे टोक ग्राइंड करून पृष्ठभाग तयार केला जाणार आहे.
सुरतजवळील किम आणि आणंद येथे उभारण्यात आलेल्या कारखान्यात स्वतंत्रपणे ट्रॅक स्लॅब तयार केले जात आहेत. हे कारखाने ट्रॅक बांधकामासाठी अचूक स्लॅब तयार करत आहेत. त्यामुळे बुलेट ट्रेनच्या रुळाला अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधा मिळणार आहेत. आजपर्यंत या मार्गावरील रुळांसाठी २३,००० हून अधिक स्लॅब टाकण्यात आले आहेत.
स्लॅब टाकण्यात आलेल्या मार्गाची लांबी ११८ किमीपर्यंत झाली आहे, अशी माहिती देण्यात आली आहे. गुजरातमधील आणंद, वडोदरा, सुरत आणि नवसारी जिल्ह्यात अनेक ठिकाणी आरसी ट्रॅक बेडचे बांधकाम सुरू झाले आहे. तसेच, आरसी ट्रॅक बेडचे सुमारे ६४ ट्रॅक किमीचे बांधकामही पूर्ण झाले आहे.
जमिनीवर आणि व्हायाडक्टवर रेल्वे, ट्रॅक स्लॅब, मशिनरी आणि उपकरणे हाताळण्यासह ट्रॅक बांधणीसुलभ करण्यासाठी समर्पित ट्रॅक कन्स्ट्रक्शन बेस (टीसीबी) योजना आणि बांधकाम केले जात आहे.
रूळ टाकण्याचे काम करणारे अभियंते आणि इतर कुशल मनुष्यबळ उपलब्ध आहे. बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी गुजरात राज्यातील सुरत ते बिलिमोरादरम्यान दोन आणि बडोदा ते आणंददरम्यान दोन असे चार रूळ सध्या कार्यान्वित करण्यात आले आहेत.
रूळ टाकण्यासाठी संपूर्ण प्रक्रिया अत्याधुनिक यंत्रणेद्वारे केली जात आहे. विशेषत: जपानी तंत्रज्ञानानुसार ती भारतात किंवा थेट जपानकडून खरेदी केली जात आहे. या प्रकल्पासाठी आतापर्यंत रूळ बांधकाम यंत्रसामग्रीच्या चार संचाची व्यवस्था करण्यात आली आहे.
मशीनच्या ताफ्यात रेल्वे फीडर कार, रूळ स्लॅब टाकण्याची कार, संबंधित वॅगन आणि मोटर कार, सीएएम लेइंग कार आणि फ्लॅश बट वेल्डिंग आदी मशीनचा समावेश आहे. सुमारे १,००० अभियंत्यांना जपानी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली ट्रॅक इन्स्टॉलेशन आणि मेंटेनन्ससाठी जागतिक दर्जाचे कौशल्य प्रशिक्षण मिळणार आहे.