.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
मुंबई (Mumbai): मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) शाळांमधील पहिली ते दहावीच्या ३ लाखांपेक्षा अधिक गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना सलग दोन शैक्षणिक वर्षांसाठी गणवेश व वह्या पुरवण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. या महाकाय खरेदीसाठी महापालिकेने सुमारे १५७ कोटी रुपयांच्या खर्चाच्या प्रस्तावाला स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी दिली आहे. मात्र, यंदा प्रथमच जेम पोर्टलचा वापर करून हे टेंडर मंजूर करण्यात आले असले, तरी प्रत्यक्ष शैक्षणिक वर्ष सुरू होण्याला अवघे काही दिवस शिल्लक असताना ही मंजुरी मिळाल्याने विद्यार्थ्यांपर्यंत वेळेत साहित्य पोहोचणार का, असा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या विविध माध्यमांच्या शाळांमध्ये प्रामुख्याने सर्वसामान्य आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील मुले शिक्षण घेतात. या गरीब पालकांना शालेय साहित्याचा आर्थिक भार सोसावा लागू नये, म्हणून महापालिकेच्या शिक्षण विभागामार्फत दरवर्षी २७ प्रकारच्या शालेय वस्तूंचे मोफत वाटप केले जाते. यामध्ये वह्या, पुस्तके, दप्तर, छत्र्या, बूट, रेनकोट, पाण्याची बाटली आणि गणवेश यांसारख्या अत्यंत आवश्यक साहित्याचा समावेश असतो.
मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती, तमिळ, तेलगू, कन्नड आणि उर्दू अशा आठ वेगवेगळ्या माध्यमांच्या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या ३ लाखांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना या साहित्याचा लाभ मिळतो. आगामी दोन शैक्षणिक वर्षांसाठी राबवण्यात येणाऱ्या या खरेदी प्रक्रियेत वह्या आणि गणवेशाचा समावेश आहे. यात विद्यार्थ्यांना दरवर्षी एक शालेय गणवेश आणि दोन वर्षांतून एकदा क्रीडा गणवेश पुरवला जाणार आहे.
जेम पोर्टलमुळे जुने टेंडर रद्द
यंदा शालेय साहित्याच्या पारदर्शक खरेदीसाठी महापालिकेने प्रथमच केंद्र सरकारच्या जेम पोर्टलचा वापर केला आहे. या प्रक्रियेमुळे यापूर्वी महाटेंडर संकेतस्थळावर राबवण्यात आलेली मूळ टेंडर प्रक्रिया पालिकेच्या शिक्षण विभागाकडून रद्द करण्यात आली आहे. नवीन प्रक्रियेनुसार पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांना मोफत वह्या पुरवण्याची टेंडर प्रक्रिया आता पूर्ण झाली असून यामध्ये सामान्य वह्यांसह चित्रकला आणि निबंध वह्यांचेही वाटप केले जाणार आहे.
विरोधक आक्रमक
एकूण १५७ कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या या प्रस्तावांना स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली असली, तरी या प्रक्रियेतील प्रचंड विलंबावरून वाद निर्माण झाला आहे. १५ जून रोजी शाळा सुरू होत असून ऐन शाळा सुरू होण्याच्या तोंडावर प्रस्ताव मंजूर केल्यामुळे विद्यार्थ्यांना जून महिना संपेपर्यंत साहित्य मिळण्याची कोणतीही शक्यता नाही, असा दावा विरोधकांनी केला आहे.
मुंबई महापालिकेतील काँग्रेसचे गटनेते अशरफ आजमी यांनी या संपूर्ण प्रक्रियेवर संशय व्यक्त केला आहे. एवढ्या उशिराने टेंडर प्रक्रिया का राबवण्यात आली, असा थेट सवाल करत त्यांनी या खरेदीत मोठ्या प्रमाणावर अनियमिता असल्याचा गंभीर आरोप केला असून या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे.
जून अखेरपर्यंत साहित्य पोहोचवण्याचे आश्वासन
या सर्व वादावर प्रशासनाची बाजू मांडताना अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांनी स्थायी समितीच्या बैठकीत स्पष्टीकरण दिले. विद्यार्थ्यांच्या वयानुसार आणि मापानुसार हे गणवेश तयार करून जून महिन्याच्या अखेरपर्यंत ते सर्व शाळांमध्ये दाखल होतील, असे नियोजन शिक्षण विभागाने केले आहे. विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप शाळा सुरू झाल्याच्या पहिल्याच आठवड्यात व्हावे यासाठी प्रशासन युद्धपातळीवर प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले, तसेच विद्यार्थ्यांना सर्व शालेय वस्तू लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
Key Points Summary
मुंबई महापालिकेच्या शाळांमधील ३ लाखांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांसाठी १५७ कोटी रुपयांची गणवेश व वह्यांची खरेदी मंजूर.
खरेदी प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी महापालिकेने प्रथमच जेम पोर्टलचा केला वापर; जुनी टेंडर प्रक्रिया रद्द.
मराठी, उर्दू, इंग्रजीसह ८ माध्यमांच्या शाळांमधील पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांना मोफत वस्तूंचे वाटप होणार.
विद्यार्थ्यांच्या आकारानुसार वार्षिक १ गणवेश तर दोन वर्षांतून एकदा क्रीडा गणवेश मिळणार.
१५ जूनला शाळा सुरू होत असताना जूनअखेर गणवेश मिळणार असल्याने कंत्राटाच्या दिरंगाईवरून मोठा गदारोळ.
खरेदी प्रक्रियेत अनियमितता असल्याचा आरोप करत काँग्रेसकडून चौकशीची मागणी; लवकर साहित्य देण्याचे प्रशासनाचे आश्वासन.