.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
मुंबई (Mumbai): बृहन्मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये शालेय विद्यार्थ्यांना दरवर्षी २७ शैक्षणिक वस्तूंचे मोफत वाटप केले जाते. या वस्तुंची खरेदी पहिल्यांदाच केंद्र सरकारच्या ‘जेम पोर्टल’वरुन (गव्हर्नमेंट ईमार्केट प्लेस) करण्यात आली असून त्यामुळे महापालिकेची दोन वर्षात ४३ कोटी रुपयांची बचत झाली आहे. तसेच यापुढे महापालिकेची औषध खरेदी सुद्धा जेम पोर्टल द्वारे करण्यात येणार आहे.
केंद्र व राज्य सरकारचे विविध विभाग व सार्वजनिक संस्थांना लागणाऱ्या खरेदीसाठी ‘जेम पोर्टल’ विकसीत करण्यात आले आहे. बृहन्मुंबई महापालिकेने २७ शैक्षणिक वस्तुंची खरेदी ‘जेम पोर्टल’व्दारे करावी, असे पत्र आमदार अमित साटम यांनी महापालिका प्रशासनाला दिले होते.
वर्ष २०२६-२८ साठी या शालेय वस्तुंची खरेदी ‘जेम पोर्टल’व्दारे करण्यात आली, त्याला २७८ कोटी ६ लाख रुपये खर्च आला. त्यापूर्वी हा खर्च ३१८ कोटी १५ लाख रुपये येत होता. ‘जेम पोर्टल’व्दारे खरेदी केल्यामुळे केवळ शालेय वस्तुंमध्ये दोन वर्षात पालिकेचे ४३ कोटी ५७ लाख रुपये वाचले असून १३ टक्के रकमेत बचत झाली आहे, असे साटम यांनी स्पष्ट केले.
‘जेम पोर्टल’व्दारे शालेय वस्तुंची खरेदी करुन मुंबई महापालिकेच्या कारभारात भ्रष्टाचार विरहीत प्रशासनाचे पाऊल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली उचलले आहे. यापुढे मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांना लागणारी औषध खरेदीसुद्धा या ‘जेम पोर्टल’व्दारे करण्यात येईल. मुंबई महापालिकेने शालेय वस्तुंच्या खरेदीच्या रुपाने ‘जेम पोर्टल’चा पहिल्यांदा वापर केला आहे, असे आमदार साटम यांनी सांगितले.